मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठविला म्हणूनच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

अॅट्रॉसिटीची कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल
मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांचा इशारा
मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या महामार्गावर वाहतूक करणे जीवघेणे ठरत.अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होत आहे.काल झाराप येथे देखील चुकीच्या मिडलकटमूळे अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महायुतीचे सत्ताधारी नेते, अधिकारी आणि ठेकेदार मात्र महामार्गाच्या दुरावस्थेमुळे होणारे मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यांना जनतेच्या जीवाची कोणतीही पर्वा नाही. झाराप येथे अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच माजी आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ त्याठिकाणी दाखल होत महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.मात्र महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांनी वैभव नाईक यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिली.त्यानुसार वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि संबंधीत अधिकाऱ्याने अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला आहे. राज्यात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यानेच या कायद्याला मराठा समाजाने आक्षेप नोंदविला होता.मात्र चुकीच्या पध्दतीने जर लोकप्रतिनिधी आणि समाजबांधवांवर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जात असेल तर मराठा समाज हे कधीच सहन करणार नाही. त्यामुळे वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत दाखल केलेली कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल असा इशारा मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांनी दिला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे खोट्या तक्रारी देऊन अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला गेला तर ज्या अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्या बाबतीत खरोखरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा घडेल त्यावेळी त्यांना लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे सतीश सावंत म्हणाले आहेत.





