शाळेच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे हातभार लावणे गरजेचे!

माजी सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर यांचे प्रतिपादन

साकेडी शाळा नंबर 1 येथे चंद्रकांत बांबर्डेकर यांच्या माध्यमातून झालेल्या सभा मंडपाच्या कामाचे लोकार्पण

मी ज्या शाळेमध्ये शिकलो या शिक्षकांमुळे मी मोठा झालो त्या शाळेचे व शिक्षकांचे ऋण फेडण्यासाठीच प्रत्येकाने दातृत्वाची भूमिका निभावली पाहिजे. केवळ दुसरा काहीतरी करतोय त्यामध्ये काड्या घालण्यापेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने अशी भूमिका निभावली तर खऱ्या अर्थाने शाळेचे ऋण फेडल्यासारखे होईल. निदान आपल्याला काही करायला जमत नसेल तर चांगलं होत आहे त्याला खोडा घालू नका. जेणेकरून चांगले काम करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याऐवजी अशांचे खच्चीकरण होऊ देऊ नका. असे प्रतिपादन सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर यांनी केले.
कणकवली तालुक्यातील साकेडी येथील सरस्वती विद्यामंदिर साकेडी शाळा नंबर 1 येथे शाळेच्या इमारती समोर स्वखर्चातून कायमस्वरूपी सभामंडपाचे काम कै. सविता चंद्रकांत बांबार्डेकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत बांबार्डेकर यांनी करून दिले. या सभामंडपाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सुरेश साटम, चंद्रकांत बांबर्डेकर, मुख्याध्यापक समिधा वारंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर परब, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, विशाखा राणे, प्रेरणा जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष मुरारी राणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष राजू सदवडेकर, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष वैशाली गुरव,राजू राणे, विनोद जाधव, संतोष राणे, माजी विद्यार्थी दिनेश गोगटे, श्यामसुंदर राणे, बाळकृष्ण राणे, संतोष मेस्त्री, वादळ मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पुढे श्री बांबर्डेकर म्हणाले, या शाळेमधून अनेक विद्यार्थी घडले. अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. काही सेवानिवृत्त झाले. यासह माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आपला हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून शाळेच्या उन्नतीचा वाटा उचलला पाहिजे. या सभामंडपाचे काम करून देत असताना काहींनी माझा उल्लेख दानशूर असा केला. मात्र मी दानशूर म्हणून नाही तर एक माझे कर्तव्य समजून हे काम करून दिले. अगदी अल्पावधीत संतोष मेस्त्री यांनी हे काम पूर्ण केले. जेणेकरून आजच्या दिवशी सरस्वती पूजनाच्या निमित्ताने या सभामंडपाचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला. या कामासाठी कुणा शाखा अभियंत्यांकडून डिझाईन का बनवले नाही? असेही प्रश्न निर्माण करण्यात आले. मात्र अनेक वर्षांचा अनुभव मेस्त्री यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच दर्जेदार काम मार्गी लागले आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण करणाऱ्यांनी आपले योगदान किती त्याचाही विचार करावा असेही श्री बांबर्डेकर यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी सरपंच सुरेश साटम यांनी शाळेची वाटचाली दैदिप्यमान सुरू असून शाळेतील विद्यार्थी हे विविध स्तरांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत. हा शाळेतील शिक्षकांचा सन्मान असून चंद्रकांत बांबर्डेकर यांनी शाळेकरीता सभामंडप बांधून दिल्याबद्दल त्यांचे श्री साटम यांनी आभार व्यक्त केले. विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी पालकांच्या उपस्थितीबद्दलही समाधान व्यक्त करत जिल्ह्यात क्वचित शाळांमध्ये अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम होतात असे सांगत या कार्यक्रमाबद्दल गौरवउद्गार काढले. याप्रसंगी चंद्रकांत बांबर्डेकर तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या दशावतारी नाटकाकरिता मेकअप साठी आलेले वादळ मेस्त्री व सहकाऱ्यांचा, तसेच अल्पावधीत सभामंडपाचे काम करणारे संतोष मेस्त्री यांच्यासहित शाळेच्या विविध उपक्रमांसाठी योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शाळेला विविध स्वरूपात देणगी देणाऱ्या देणगीदारांबद्दलही शाळेच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. शाळेच्या अहवालाचे वाचन मुख्याध्यापक समिधा वारंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पडले. तर कोकणची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेल्या व विद्यार्थ्यांनी साकारलेल्या “मायाजाल” या दशावतारी नाटकाचे उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले. प्रेक्षक वर्गामधून देखील या सर्वच कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मेस्त्री यांनी केले.

error: Content is protected !!