होम मिनिस्टर’ स्पर्धेत उज्ज्वला घाडीगावकर ठरल्या ‘पैठणी’च्या मानकरी!

ओंकार मित्र मंडळ मधलीवाडीचे आयोजन : द्वितीय माधवी बुचडे तर तृतीया सुजाता सावंत
नवरात्री उत्सवाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात, कणकवली येथील ओंकार मित्रमंडळ, मधलीवाडी यांच्या वतीने महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातील उत्साहाला वाव देणाऱ्या या स्पर्धेत कणकवली मधलीवाडी येथील श्रीमती उज्ज्वला घाडीगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी साडी जिंकण्याचा बहुमान मिळवला.
या स्पर्धेला कणकवली मधलीवाडी येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 40 महिलांनी सहभाग घेतला होता. विविध मनोरंजक खेळ आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून महिलांनी आपला आत्मविश्वास आणि बुद्धीचातुर्य सिद्ध केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक श्रीमती उज्ज्वला घाडीगावकर यांना पैठणी साडी, द्वितीय क्रमांक श्रीमती माधवी बुचडे यांना मिक्सर, तृतीय क्रमांक श्रीमती सुजाता सावंत यांना प्रेशर कुकर अशी आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला मंडळाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देऊन त्यांचा सहभाग नोंदवला गेला.
स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि उत्स्फूर्त समालोचन बाळू वालावलकर यांनी केले, ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली. स्पर्धेचे परीक्षण प्रकाश बुचडे, जयप्रकाश परब आणि महेश राणे यांनी अत्यंत तटस्थपणे केले.
नवरात्रीच्या काळात ओंकार मित्रमंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.





