भरणी ग्रामस्थांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी भेट

भव्य नागरी सत्काराचा ग्रामसभेत एकमुखी ठराव
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम् गणेश निवासस्थानी भरणी गावच्या ग्रामस्थांनी भेट घेऊन गावाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्याबाबत चर्चा केली करतानाच त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच गावच्या विकासकामांबाबतही चर्चा केली.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच अनिल बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री राणे यांच्या ग्रामविकासातील भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्याबाबतची माहिती ग्रामस्थांनी प्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांना दिली.
भेटीदरम्यान सत्कार समारंभाच्या संभाव्य तारखेबाबत सविस्तर चर्चा झाली, तसेच भरणी गावातील सुरू असलेली आणि आगामी विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच अनिल बागवे यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष चंद्रकांत घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे, प्रतिष्ठित नागरिक गंगाराम गुरव, भारतीय मजदूर संघ गवंडी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक अंकुश घाडीगावकर, विवेक ताम्हणकर, प्रकाश गुरव, धोंडू गुरव, गणपत गुरव, विलास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामसभेने घेतलेल्या या एकमुखी ठरावामुळे भरणी ग्रामस्थांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरील विश्वास आणि कृतज्ञतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. आगामी काळात नियोजित नागरी सत्कार सोहळ्याद्वारे हा सन्मान औपचारिक स्वरूपात व्यक्त करण्यात येणार आहे.





