‘ ज्ञान संपन्न फार्मासिस्टचा समाजाला लाभ’……..फार्मासिस्ट केळुसकर

केवळ पैसा कमविण्यासाठी फार्मासिस्ट होवु नका तर ज्ञान संपन्न व्हा, समाजाला त्याचा लाभ होईल. तसेच उत्तम फार्मासिस्टसाठी शरीरशास्त्राची परिपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन जेष्ठ फार्मासिस्ट मंगेश केळुसकर यांनी हुमरमळा येथील पुष्पसेन ज्ञानपीठातील एका कार्यक्रमात केले.
हुमरमळा कुडाळ येथील श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसी दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केळुसकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत,परिसर संचालिका सौ. नुतन परब , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.युवराज पांढरे, कुडाळ तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अभय नाईक, सचीव दिपक परब, फार्मसीस्ट सौ. समीक्षा सुतार, नर्सिंग स्कुलचे प्राचार्य ओंकार गरड, कृषी कॉलेजचे प्राचार्य अमित लोडम, फार्मसीस्ट सौ. मानसी परब आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीला दिप प्रज्वलनाने झाली. त्या आधी माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी फार्मसी दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
फार्मसीस्ट म्हणून मेडिकल क्षेत्रात गेली ४२ वर्षे निष्ठेने व सेवाभावाने कार्य करणा-या मंगेश केळुसकर यांना महाविद्यालयाच्या वतीने पुष्पसेन आरोग्य रत्न- २०२५ पुरस्कार संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांनी पी एच डी धारण केल्याबद्दल संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत म्हणाले की, चांगल्या व अनुभवी फार्मसीस्टला कॉलेजच्या वतीने पुरस्काराने गौरविताना खुप आनंद होत आहे. अभय नाईक, दिपक परब, परिसर संचालिका सौ. नुतन परब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक महादेव परब यांनी केले. सुत्रसंचालन कु. आर्या सावंत व कु. अनुराधा सावंत यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षक गणू गावडे यांनी केले.





