EDUCON 2025 : मुंबईमध्ये होणार शिक्षकांसाठी पाचवी विशेष शिक्षक परिषद परिषदेस हजारो शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित राहणार

शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी सदैव सक्रिय असणाऱ्या मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली EDUCON 2025 हि पाचवी विशेष शिक्षक परिषद येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. सदर परिषदेचे यंदाचे ५वे वर्ष असून शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते डॉ विशाल कडणे यांच्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ करत आहे, हे संमेलन विशेषतः शाळा शिक्षक आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

सदर परिषद यशस्वी करण्यासाठी किरण शेलार मार्गदर्शन करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात नवे विचार, नवे मार्गदर्शन सातत्याने शिक्षक बांधवाना मिळावे यासाठी EDUCON 2025 मध्ये मुंबई आणि आसपासच्या विभागातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि नव्या पिढीचे मार्गदर्शक एकत्र येणार असून, शिक्षणातील नवसंकल्पना, डिजिटल शिक्षण, मूल्याधारित शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा प्रभाव यावर सखोल चर्चा होणार आहे, असे शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी सांगितले.

शिक्षण चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ. विशाल कडणे हे समस्त शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. EDUCON 2025 हे संमेलन त्यांच्या दूरदृष्टीचा आणि शिक्षण चळवळीवरील प्रेमाचा एक भाग आहे, असे भगवान सागर यांनी सांगितले.

सदर परिषदेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन आणि नैतिक शिक्षण, शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि सक्षमीकरण अशा प्रकारच्या विविध सत्रांचे आयोजन असेल. शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ विविध राज्यांतील पुरस्कारप्राप्त शिक्षक, विविध विद्यापीठांचे अधिष्ठाता व मान्यवर परिषदेतील विविध सत्रांस मार्गदर्शन करतील. नव्या अध्यापन पद्धती, शैक्षणिक नेतृत्व आणि व्यवस्थापन, विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य व अन्य विषयांवर कार्यशाळेचे आयोजन सदर परिषदेमध्ये असेल. शिक्षक-प्राध्यापक संवाद मंच, शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांशी संपर्क अशा प्रकारच्या नेटवर्किंग संधी परिषदेच्या निमित्त्ताने शिक्षक बांधवांसाठी उपलब्ध होतील असा विश्वास आयोजक समितीच्या वतीने आरती बागले यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांचे सत्र, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी सत्र आणि पुरस्कार वितरण असे सदर परिषदेचे स्वरूप असेल असे डॉ यशोधरा वराळे आणि डॉ. चंद्रशेखर भारती यांनी सांगितले.
सदर परिषदेमध्ये दर १५ मिनिटाला उपस्थित शिक्षक बांधवांसाठी लक्की ड्रॉ कुपन काढण्यात येतील, त्यामध्ये अनेक भेटवस्तू उपस्थित शिक्षकांना शिक्षक मंडळाकडून दिल्या जातील, असे डॉ विशाल कडणे यांनी सांगितले.

EDUCON 2025 हे संमेलन शिक्षकांना नव्या दिशा देणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलनाची अधिकृत नोंदणी दिनांक १९ सप्टेंबर पासून सुरु झाली असून, इच्छुक शिक्षकांनी सोबत दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून अथवा व्हाट्स अपच्या माध्यमातून ९५९४०२०८८८ ह्या क्रमांकावर संपर्क करून आपली नोंदणी करण्याबाबत आयोजक समितीने कळविले आहे.

error: Content is protected !!