तळेरेत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जनजागृती मोहीम – व्यसनमुक्त आणि स्वच्छ गणेशोत्सव साजरी करण्याचे भाविकांना गणेश भक्तांना कविता, संदेशांतून आवाहन

ग्रामपंचायत तळेरे तसेच डॉ. अनिल नेरूरकर प्रेरीत तंबाखू प्रतिबंध अभियान चळवळीच्या प्रणेत्या सौ. श्रावणी मदभावे आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यसनमुक्त समाज व अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमादरम्यान ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण बाजारपेठेत फिरून प्रत्येक व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देत तंबाखू-गुटखा विक्रीवरील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत गणपती बाप्पाच्या गोड मोदक देऊन विनंती करण्यात आली. तसेच बसस्थानकात जाऊन प्रवाशांनाही व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
यावेळी स्पर्शिका मदभावे हिने कवितेद्वारे व्यसनमुक्त सिंधूदूर्ग कवितेचे सदरीकरण करून सर्व प्रवाशांचे मन जिंकले.
कार्यक्रमात गणेशोत्सवातील कायद्याचे कडक पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले. तसेच प्लास्टीक पिशव्या न वापरण्याचे आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाने करत असतानाच श्रावणी मदभावे यांनी जुन्या परंपरेप्रमाणे गणेश चतूर्थी मधील भजनांच्या दरम्यानच्या अंधश्रद्धा व अज्ञानामुळे प्रचलित असलेल्या तंबाखू-पानाच्या तबकडीद्वारे पाहुणचार या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या गणेश चतुर्थी ला नवा संकल्प दिला. “तंबाखू पानाच्या ऐवजी आरोग्यदायी पाहुणचार करा..
आणि समृद्ध कोकणाची नवी ओळख निर्माण करा नवी परंपरा सुरू करून स्वच्छ निरोगी दिर्घायूषी व्हा” असा संदेश सर्वांना देण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रावणी मदभावे यांनी घातलेली साद गाऱ्हान्याच्या रूपात गणपती बाप्पा नक्की ऐकतील आणि व्यसनमुक्त – स्वच्छ सिंधूदूर्ग चे नेरूरकरांचे स्वप्न सत्यात उतरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले आणि या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .
तळेरे गावचे सरपंच श्री. हनुमंत तळेकर म्हणाले: “गेली तेरा वर्षे तळेरे येथील व्यसनमुक्तीचा वसा घेतलेल्या या कार्यासाठी ग्रामपंचायत व समाजातील सर्व नागरिकांनी पाठिंबा देऊन प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. हे आपल्या समाजासाठी आणि भावी पिढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.”
कार्यक्रमाच्या सांगता वेळी विशेष गणेश आरती सादर केली:
“जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती; तंबाखू सोडायची दे आम्हा स्फूर्ती.” जय देव, जय देव
या उपक्रमात सरपंच श्री. हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी सौ. राजलक्ष्मी जाधव, सदस्य श्री. संदीप घाडी, श्री. शैलेश सुर्वे, श्री. सुनील बांदिवडेकर, श्रीमती. शर्वरी वायंगणकर, पोलीस अधिकारी श्री. झोरे, पोलीस पाटील श्री. जाधव (तळेरे), सौ. जंगले (औदुंबर नगर), माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. शशांक तळेकर, माजी उपसरपंच श्री. दिनेश मुद्रस, तळेरे वाहतूक नियंत्रक एम. एन. चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सोरप, अमली पदार्थ प्रतिबंध समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्त्या तथा नशाबंदी मंडळ अध्यक्षा – सौ. श्रावणी मदभावे, सतिश मदभावे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
	




