शासनाच्या कंत्राटी चौकशी अधिकारी पॅनेलवर विजय चव्हाण आणि राजेंद्र पराडकर

पुढील दहा वर्षांसाठी निवड
कुडाळ : महाराष्ट्र शासनाने कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी पॅनेलवर कुडाळचे माजी गट विकास अधिकारी विजय मुकुंद चव्हाण यांची पुणे व कोकण साठी तर राजेंद्र पराडकर यांची कोकण विभागासाठी वयाच्या ७० वर्षापर्यंत म्हणजेच पुढील १० वर्षासाठी निवड करून सिंधुदुर्गच्या सुपुत्रांचा सन्मान केला आहे.
शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून त्यांचा सेवाकाळात त्यांच्याकडून घडलेल्या अक्षम्य चुकांमुळे त्यांचेवर निलंबन, शिस्तविषयक कारवाई करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येते. अशा प्रकारची अनेक प्रकरणे वारंवार घडत असून त्या प्रकरणाचा तातडीने आणि सातत्याने निपटारा होणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांची सखोल चौकशी तातडीने पूर्ण होऊन त्यावर अंतिम निर्णय होणे आणि दोषी अधिकारी यांचेवर कडक कारवाई होणे प्रशासनाच्या आणि जनतेच्या दृष्टीने गरजेचे असतें. निवड झालेल्या अधिकारी यांचेकडे प्राप्त प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करून दर तीन महिन्यांनी प्रगतीचा अहवाल थेट शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर करावयाचा आहे.
यासाठी सेवानिवृत्त झालेले पण सक्षम व पात्र असलेले अधिकारी यांची कंत्राटी तत्वावर “चौकशी अधिकारी ” म्हणून गट अ, गट ब,गट क व ड, वर्गाचे अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 22/8/2025 रोजी शासन निर्णय काढून ” पॅनेल ” तयार करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रसाठी गट अ साठी २८ गट ब साठी १६ तर गट क व ड साठी २५ अधिकाऱ्याचे पॅनेल यादी तयार करण्यात आली आहे. तर ४३ अधिकारी यांना अपात्र ठरविणेत आले आहे.
यामध्ये गट ब च्या पॅनेलवर सिंधुदुर्गचे दोन सुपुत्र, ज्यांनी आपल्या कार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला सतत राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळवून दिला ते विजय चव्हाण व राजेंद्र पराडकर याची निवड करण्यात आली आहे.
विजय चव्हाण यांना शासनाचा सर्वोच्च मानाचा “गुणवंत अधिकारी २०१८” चा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांनी आपल्या गट विकास अधिकारी कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने त्यांनी लांजा, मालवण, देवगड, कुडाळला यशवंत पंचायत अभियान, नरेगा अभियान, स्वच्छता अभियान, पर्यावरण अभियान, शोष खड्डे, प्रधानमंत्री आवास योजना अभियान,उमेद अभियान अश्या विविध अभियानात राज्य स्तरावर सातत्याने प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त करून पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला यश मिळवून दिले आहे. कोंकण पातळीवर पुरस्कार मिळवून दिले आहेत. याशिवाय दरवर्षी राज्यातील लक्षवेधी विधवा प्रथा बंदी, रानभाज्या महोत्सव, पाककला महोत्सव,चिखलधूनी, कुकारो, वाडवाळ महोत्सव, स्थानिक गावठी बाजार,श्रावणमेळा महोत्सव, कच्चे बंधारादिन, घर तिथे शोष खड्डा अभियान, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचेसाठी दरवर्षी कला..क्रीडा महोत्सव, सॅल्यूट टू शिपाई, जिथे मागास वस्ती तिथे संपूर्ण प्रशासन भेट, कोविड मध्ये प्रत्येक बंद पडणारी चूल नेहमी पेटली पाहिजे यासाठी आपल्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला स्वतःच्या खिशात हात घालून दातृत्व दाखवून दिले. विशेष म्हणजे कुडाळ पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी या पदावर त्यांनी साडेसहा वर्ष कारकीर्द केली. त्या कारकीर्दीत त्यांनी केलेली लक्षवेधी कामे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. एका बाजूने त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणजे त्यांना व तसेच श्री पराडकर यांची शासनाच्या चौकशी अधिकारी पॅनलवर पुढील दहा वर्षासाठी झालेली निवड ही निश्चितच सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा राहणारी बाब आहे.
राजेंद्र पराडकर यांनीही आपल्या कार्यकाळात देवगड, मालवण येथे बिडीओ म्ह्णून तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे अतिशय उल्लेखनीय कामं करून अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. सिंधुदुर्गच्या या दोन्ही सुपुत्रानी आपल्या अभ्यासू आणि लोकाभिमुख कामगिरी करून जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. शासनाने त्यांच्या गौरवास्पद कारकिर्दीची दखल घेऊनं त्यांची निवड केली त्याबाबत त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.





