शिडवणे नं. १ शाळेत ‘भाकरी डे’ उपक्रम उत्साहात साजरा

शिडवणे नं. १ शाळेत शनिवार, २३ ऑगस्ट रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘भाकरी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात मुलामुलींनी पारंपरिक पद्धतीने भाकरी बनवण्याचे प्रात्यक्षिक अनुभवले, ज्यामुळे त्यांना श्रमप्रतिष्ठा आणि पाककलेचे महत्त्व समजले.

      हा उपक्रम केवळ एक खेळ नसून, विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये शिकवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून मुलांना अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेची ओळख झाली आणि आपल्या आई-वडिलांना जेवण बनवताना किती कष्ट पडतात,याची जाणीव झाली. तसेच,चुलीवरच्या जेवणाचे वाढत असलेले महत्त्व लक्षात घेता,यातून विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक संधींचीही माहिती मिळाली.

      या उपक्रमात शफा शेख, श्रावणी भोवड, फरीन शेख, तनिष्का पाटणकर, जोया शेख, वेदिका रांबाडे, आर्या रांबाडे, वैष्णवी टक्के, सबा शेख, श्रावणी पाष्टे, मैथिली टक्के, साक्षी पाष्टे, शुभ्रा पांचाळ, धनश्री सुतार या मुलींनी, तसेच उत्कर्ष टक्के, आयुष येतकर, आर्यन कासार्डेकर, श्रेयांश पांचाळ या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी स्वतः भाकरी थापून आणि भाजून पाहिली.

      भाकरीसोबत झुणका बनवून सर्व विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणात 'झुणका-भाकर' भोजनाचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उपक्रमाला शाळेच्या मुख्य स्वयंपाकी समिता सुरेश सुतार, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी आणि माता पालक समीक्षा सचिन सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल आणि उपशिक्षक सुरेंद्र यादव यांनी या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.
error: Content is protected !!