कणकवलीत भाजपा – शिवसेनेची पहिल्यांदाच उद्या संयुक्त पत्रकार परिषद

आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे दिसणार पत्रकार परिषदेनिमित्त एकत्र

कणकवली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग

शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या. या घडामोडींचे पडसाद हे आता जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये उमटू लागले असून, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख असलेले संजय आंग्रे हे यापूर्वी राणेंची साथ सोडून माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासोबत त्यावेळच्या ठाकरे शिवसेनेत गेले होते. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय गणिता नंतर त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ धरली. व काही दिवसांनी आमदार नितेश राणे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचे राजकीय सुत आता जुळून येत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या देवगड जामसांडे नगरपंचायत च्या निवडणुकीत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी भाजपाच्या विषयी समिती सभापती पदासाठी युतीतील भाजपा च्या उमेदवाराच्या नावांचा व्हीप जाहीर केला होता. त्यानंतर आता पुन्हा कणकवली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीनी वेग घेतला असून, उद्या 29 मार्च रोजी दुपारी 1 वाजता कणकवलीतील प्रहार भवन येथे भाजपा व शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पत्रकार परिषदेनंतर येत्या काळात वेगळी राजकीय गणिते कणकवली विधानसभा मतदारसंघात दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच ही पत्रकार परिषद येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची नांदी ठरण्याची देखील शक्यता आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!