ठाकरे सेनेच्या वतीने मुंबई-गोवा हायवेवर चक्का जाम आंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आमचे आंदोलन शांततेत, हायवे दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन तीव्र !

माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज सकाळी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसानी माजी आमदार वैभव नाईक यांच्या सह ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी या महामार्गावरून कोकणात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाची दुरवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात काही जणांचे बळी गेले आहेत, त्यामुळे प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता आंदोलनाची वेळ होती पण त्या पूर्वीपासूनच हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत महाविद्यालयासमोरच्या महामार्गावर राणे स्टॉप येथे ठाकरेसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता. हायवेवरच स्टॉप जवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. आंदोलनात माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, उप जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, जयभारत पालव, राजन नाईक, अतुल बंगे, महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब, क्षेया दळवी, बबन बोभाटे, राजू राठोड, राजेश टंगसाळी, बाळा कोरगावकर,अवधूत मालंडकर, पिंट्या उबारे आदी सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख शाखाप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुरुवातीला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिताना संबोधित करताना हे आंदोलन कशासाठी करत आहोत हे सांगितले. १०-१२ वर्ष होऊन गेली तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. जिल्ह्यात महामार्गाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात नागरिकांचा, वाहनचालकांचा जीव जात आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी शासन, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे , खासदार नारायण राणे, महामार्ग अधिकरी यांच्या वर जोरदार टीका केली. महामार्गाच काम ९८ टक्के पूर्ण झालं असं सांगितलं जातं. पण काही उड्डाणपूल, काही ब्रिज यांची काम व्हायची आहेत. त्याला एक दोन वर्षे लागतील तरी देखील शासन लवकरच महामार्गाच काम पूर्ण होईल असा शब्द देऊन जनतेची फसवणूक करत आहे. खासदार नारायण राणे यांनी हायवेबाबत एकदाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर महामार्गाची डागडुजी झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिला.
त्यांनतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महामार्गावर बैठक मारली आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत महामार्गावर दुधाचा अभिषेक केला. महिला कार्यकर्त्यांनी रांगोळी काढली आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना हायवेवरून उठवून बाजूला केलं.
महामार्ग अधिकारी आल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. पोलिसांनी देखील हि मागणी मान्य करून महामार्ग अधिकाऱ्यांशी आंदोलकांची चर्चा घडवून आणली. २५ ऑगस्ट पूर्वी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन हायवेच्या आधिकऱ्यानी दिले. त्यांनतर माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना ओरोस पोलिसांनी ताब्यात घेतले.

error: Content is protected !!