कोकण रेल्वेच्या रो रो कार सेवेला आता नांदगावात थांबा

कोलाड ते वेर्णा दरम्यान प्रवाशांना दिलासा
कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय, संघर्ष समितीच्या मागणीला यश
पालकमंत्री नितेश राणेंकडे केली होती मागणी
कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी यंदा रो रो कार सेवा सुरू केली होती. या रो रो सेवेला कोलाड (रायगड) व वेर्णा (गोवा) हे थांबे निश्चित केले होते. मात्र आता कार रो रो सेवेला नांदगाव स्थानकात थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतून रेल्वेतून कार घेऊन आलेल्या चाकरमान्यांना आता सिंधुदुर्गातील नांदगाव येथे कार उतरता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील या प्रश्नी समितीने लक्ष वेधले होते.
कोकण रेल्वेची रो रो कार सेवा कोलाड येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर नांदगाव येथे रात्री १० वाजता ही रो रो कार थांबेल. तर नांदगाव येथून रात्री 12 वाजता गोव्याच्या दिशेने प्रस्थान करणार असून वेर्णा येथे पहाटे 6 वाजता पोचणार आहे.
परतीची रो रो कार सेवा वेर्णा येथून दुपारी 3 वाजता निघेल. नांदगाव येथे ही रो रो कार गाडी रात्री 8 वाजता येईल आणि रात्री 10.30 वाजता मार्गस्थ होऊन कोलाड येथे पहाटे 6 वाजता पोचणार आहे. रो रो सेवेला सिंधुदुर्गात थांबा नसल्याने प्रवाशांमधून नाराजी होती. या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वेने नांदगाव स्थानकातही रो रो सेवेला थांबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली