संत राऊळ महाराज कॉलेजमदाहे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा

‘नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान

कुडाळ : मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन विभागाच्यावतीने “नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर केंद्र सरकारचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री. सुहास पाटील यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात अनेक विद्यार्थी इतरत्र क्लासेसना प्राधान्य देतात व कधीकधी महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते. हे लक्षात घेऊन प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व महाविद्यालयीन शिक्षण एकत्र साधता यावे, या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सुहास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. आपल्या सखोल आणि वास्तवाशी नातं असलेल्या मार्गदर्शनात श्री. पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता आपल्या पात्रतेनुसार नागरी सेवा परीक्षांना सामोरे जावे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जाहिराती व भरती प्रक्रिया यांची माहिती मिळण्यासाठी एकत्रित संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांनी पुढे सांगितले की, स्पर्धा परीक्षा हा एकमेव पर्याय न ठेवता विद्यार्थ्यांनी विविध करिअरच्या संधी शोधाव्यात. काही वर्षे प्रयत्न करून देखील यश मिळाले नाही, तर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार इतर नोकरी किंवा व्यवसायाचेही पर्याय उघडे ठेवावेत. प्रयत्न करत राहणे, अभ्यासाची योग्य पद्धत आणि मन:पूर्वक अभ्यास हे यशाचे सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक माध्यमांवरील माहितीपेक्षा पुस्तकांचे वाचन अधिक विश्वासार्ह असून त्यातूनच सखोल ज्ञान मिळते, असे मतही त्यांनी मांडले. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेचेही ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. भविष्यकाळातही मार्गदर्शनासाठी आपण नेहमी तयार असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी महाविद्यालयाच्या उपलब्ध सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. जी. चव्हाण यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय व नियोजन ग्रंथपाल डॉ. साईनाथ लोखंडे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!