कणकवली शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करा!

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवरही दंडात्मक कारवाई करा

भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस ऋतिक नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी आणि चौकाचौकातुन मोकाट सोडलेली गाय, म्हैस, बैल अशी गुरे जनावरे मुक्तपणे फिरत असून, काही ठिकाणी अशा जनावरांमुळे काही अपघात घडत आहेत. तर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव देखील वाढला आहे. मात्र भविष्यात मोठे अपघात घडू नये नयेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून अशा मोकाट जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायतीने करावा अशी मागणी कणकवली शहरातील भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस ऋतिक नलावडे व भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे, सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये कणकवली शहरांमध्ये हे अत्यंत गजबजलेल्या वस्तीचे शहर आहे. इथे माणसांप्रमाणे विविध वाहने वेगाने अथवा गडबडीने चालवली जातात. अशावेळी मोकाट फिरणारी जनावरे अचानक वाहनांच्या आडवी धावत येतात. तर कधी कधी रस्त्याच्या कडेला रस्त्याबरोबर बसुन राहतात. अशावेळी जनावरे न दिसल्याने रात्रीचे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या मोकाट जनावरांचे मलमुत्र शेण वाटेवर पडल्याने लोकांच्या आरोग्यास ते अपायकारक ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण साचत असल्याने आजार फैलावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यावर उचित कारवाई होणे आवश्यक आहे. अशी मोकाट जनावरे पकडून ठेवण्यासाठी ३ वर्षापुर्वी कणकवली नगरपंचायतीने गोपुरी आश्रम वागदे यांचेशी चर्चा करून त्यांच्या कोंडवाडयामध्ये पकडलेली जनावरे ठेवावीत. त्यानंतर ठरलेली दंडाची रक्कम नगरपंचायतीकडे भरून आपली जनावरे ओळख पटवून न्यावीत असे ठरले होते. परंतु सध्या अशी कोणतीही कारवाई नगरपंचायतीकडून होत नसल्यामुळे फिरणाऱ्या मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. आणि नागरिकांपुढे धोके वाढत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने वृत्तपत्रांतुन जाहिरात प्रसिध्द करून मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस पाठवाव्यात तसेच संबंधित जनावरांच्या मालकांना दंड ठोठावण्यात यावा.मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपंचायतीने स्वतंत्र पथकाची नेमणुक करावी. तसेच कणकवली शहर परिसरातुन रिक्षाव्दारे प्रचार करत सुचनापत्रके वाटप करावीत. अशा मोकाट जनावरांची पशुवैदयकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात यावी. या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी भाजपयुवा मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. यावेळी सिद्धेश वालावलकर, बाळा डिचोलकर, चेतन पवार,गोपाळ बागायतकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!