कुरंगवणे मांजरेकर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच खाजगी बांधकाम करणाऱ्या मालकाने रस्त्याची केली तोडफोड
कणकवली तालुक्यातील कुरंगवणे मांजरेकर वाडी कडे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून नडगिवे येथून जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली असून स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता एका खाजगी व्यवसायीक बांधकाम करणाऱ्या मालकाने सदर रस्ता जेसिपी च्या साहाय्याने मूळ रस्ताच उखडून टाकला असून सद्य स्थितीत हा रस्ता धोकादायक झाला असून रस्त्याला लागून खाजगी बांधकाम करणाऱ्या मालकावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुरंगावणे सरपंच श्री संतोष ब्रह्मदंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार यांचेकडे केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरून नडगिवे येथून कुरांगवणे मांजरेकर वाडी कडे जाणारा हा रस्ता सुमारे ३० वर्षे पासून या रस्त्यावरून रहदारी चालू आहे.तसेच हा रस्ता फक्त एका मांजरेकर वाडी कडेच जात नसून तो नडगिवे येथील इंग्लिश मिडीयम स्कूल कडे देखील जाणारा महत्वाचा रस्ता आहे.याबरोबरच खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी व चिंचवली गाव आणि खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा पर्यायी रस्ता म्हणून पूर सदृशस्थिती फायद्याचा ठरतं आहे.असे असताना सद्या ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे.त्यामुळे भविष्यात एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. खाजगी बांधकाम करत असणाऱ्या जागा मालकाने जमिनीचे सपाटीकरण करताना मातीचा अतिरिक्त भराव दगड टाकून मूळ रस्ता तोडफोड करून विस्थापित करून टाकला आहे. तर संबधीत मालकाने आपल्या प्लॉटच्या बाजूने पर्यायी रस्ता काढून देण्याचा प्रयत्न केला असून पण तो कच्चा मातीचा असून वाहतुकीस सद्यस्थितीत धोकादायक आहे.यामुळे या मार्गावरून शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बस ना जीव धोक्यात घालून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
गेल्यावर्षी सदर रस्ता खोदाई करत असताना स्थानिक ग्रामपंचायतीने हे रस्ता खोदाईचे काम बंद पाडले होते.मात्र संबधीत मालकाने ग्रामपंचायत किंवा स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपले काम बेदरकारपणे सुरूच ठेवले आहे.याबाबत कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच साहयक अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग कार्यालय खारेपाटण,मा.तहसीलदार कणकवली, बिट अंमलदार खारेपाटण पोलीस स्टेशन आदी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार निवेदन देण्यात आले असून सदर रस्ता पूर्ववत सुस्थितीत करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.