कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वे चे काम पूर्ण

सिंधुदुर्ग वासियांसाठी मोठी बातमी
अहवाल कोकण रेल्वे कडे सादर केला जाणार
लवकरच प्रत्यक्ष कार्यवाहीची शक्यता
कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर ते मुकांबिका रोड आणि माजोर्डा ते वैभववाडी या दरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. त्यासाठी क्यूमॅक्स कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले.मार्च महिन्यात त्याचा अहवाल कोकण रेल्वेकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कोकण रेल्वे दुपदरीकरणाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याला भागीदार असलेली चार राज्ये आणि केंद्र सरकारनेही मंजूरी दिली आहे. तर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होवो अथवा न होवो, रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी कोकण रेल्वेने गेल्या वर्षापासून कार्यवाही सुरू केली होती. त्याअनुषंगाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ठोकूर ते मुकांबिका रोड आणि माजोर्डा ते वैभववाडी या दरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण सर्वेक्षणासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. आलेल्या निविदांमधून क्यू मॅक्स या कंपनीची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली. तर क्यू मॅक्स या कंपनीने नोव्हेंबर २०२५ पासून रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे सर्वेक्षण सुरू केले होते. हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवाल लवकरच कोकण रेल्वे महामंडळाला सादर केला जाणार आहे. यामध्ये या दुपदरी मार्गासाठी लागणारी अतिरिक्त जमीन, छोटे आणि मोठे पूल, अंडरपास आदींचा विस्तृत आराखडा या कंपनीकडून कोकण रेल्वे प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दुपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यात बोगदे आणि मोठमोठे डोंगर दऱ्यांचा भाग वगळला होता. पहिल्या टप्प्यात कर्नाटक राज्यातील ठोकूर ते मुकांबिका रोड या ११२ किलोमीटर आणि माजोर्डा (गोवा) ते वैभववाडी (सिंधुदुर्ग) या १५१ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण प्रस्तावित केले आहे. क्यू मॅक्स या कंपनीकडून विस्तृत अहवाल आल्यानंतर त्यासाठी लागणारा निधी उपलब्धतेसाठी कोकण रेल्वे वित्तीय संस्था आणि केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे. दरम्यान बोगद्यांसह उर्वरीत कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठीही कोकण रेल्वे महामंडळाने निविदा काढल्या असून लवकरच उर्वरीत मार्गाच्या दुपदरीकरणाचेही सर्वेक्षण सुरू होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या ४७ किलोमिटर मार्गाचे दुपदरीकरण २०२१ मध्ये पूर्ण झाले. आता वैभववाडी ते गोव्यातील माजोर्डा आणि कर्नाटक राज्यातील मुकांबिका रोड ते कोकण रेल्वे हद्दीतील शेवटचे स्थानक ठोकुर या मार्गाचे दुपदरीकरण प्रस्तावित केले आहे. दुपदरीकरणाबाबतचा अहवाल अनुकूल आल्यास कोकण रेल्वे मार्गावर नवीन १८ स्थानके देखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
दिगंबर वालावलकर कणकवली





