कुंभवडे येथील “त्या” साकवांची गटविकास अधिकारी यांच्याकडून पाहणी

ग्रामपंचायत ने तातडीने साकवाची दुरुस्ती करण्याचे आदेश
युवासेना विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर यांनी वेधले होते लक्ष
कणकवली तालुक्यातील कुंभवडे टीपरवाडी येथील साकव धोकादायक स्थितीमध्ये असल्याबाबत नुकतेच कोकण नाव न्यूज चॅनल च्या माध्यमातून वृत्तप्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेत कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी कुंभवडे टिपरवाडी तसेच कुंभवडे कृपाळवाडी मधील देखील साकवाची पाहणी केली. दरम्यान या साकवांचा काही भाग जरी धोकादायक असला तरी त्या भागातील नागरिकांना अन्य पर्यायी मार्ग नसल्याने त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तसेच साकव दुरुस्तीच्या कार्यक्रमांमध्ये या साकवांची कामे दुरुस्तीसाठी प्रस्तावित करावी व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून द्यावे अशा सूचना बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता गणेश कडूलकर यांना दिल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
कुंभवडे टिपरवाडी या ठिकाणचा साकव धोकादायक स्थितीत असल्याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत या साकवांची पाहणी करण्यात आली. यावेळी कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गणेश कडुलकर, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच विजया कानडे, ग्रा. प. सदस्य संदीप सावंत, आजय पांचाळ, युवासेना विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांसहित अन्य अधिकाऱ्यांनी या सकवा वरून चालत जात पाहणी केली. टिपरवाडी येथील साकवाच्या चालत जाण्यासाठी घातलेल्या सिमेंटच्या काही प्लेट तुटल्या होत्या. या प्लेट च्या खालील असलेले स्ट्रक्चर खराब झालेले असल्याने प्लेट तुटल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे खराब झालेला स्ट्रक्चर चा लोखंडी भाग तातडीने दुरुस्त करा तसेच या प्लेट तुटलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लाकडी फळ्या बसवा असे आदेश यावेळी देण्यात आले. तर कृपाळवाडी येथील देखील साकवा वरून चालत जाताना पकडण्यासाठी असलेल्या रेलिंग काही भागात खराब झाले आहे. ते देखील तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्याची माहिती श्री चव्हाण यांनी दिली. या तातडीने दुरुस्तीसाठीच्या कामांचे अंदाजपत्रक करून देण्याच्या सूचना शाखा अभियंता यांना दिल्या असून शासनाकडून येत्या साकव दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने ही कामे त्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली.