शिडवणे नं. १ शाळेत उपविभागीय अधिकारी मा. जगदीश कातकर यांचा सत्कार

‘आनंदाची अक्षरफुले’ संग्रहाचे प्रकाशन
‘१०० शाळांना भेटी’ या उपक्रमांतर्गत कणकवलीचे उपविभागीय अधिकारी मा. जगदीश कातकर यांनी आज शिडवणे नं. १ शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचा सुंदर, निसर्गरम्य परिसर आणि भव्य ट्रॉफीयुक्त शालेय कार्यालय पाहून ते विशेषतः प्रभावित झाले.
या भेटीप्रसंगी, माजी वित्त व बांधकाम सभापती मा. रविंद्र जठार यांच्या शुभहस्ते मा. जगदीश कातकर यांचा शाल, श्रीफळ आणि विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती देऊन गावाच्या व शाळेच्या वतीने मोठ्या आदराने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिडवणे गावचे सरपंच मा. रविंद्र शेट्ये, उपसरपंच मा. दिपक पाटणकर, तलाठी आमरसकर, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पांचाळ व स्मिता टक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया पाष्टे, पोलीस पाटील समीर कुडतरकर, ग्रामपंचायत अधिकारी देवेन्द्र नलावडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षिका सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि दिपक काळेल हे शिक्षकवृंदही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. मा. रविंद्र जठार यांनी आपल्या मनोगतात उपविभागीय अधिकारी मा. जगदीश कातकर यांच्या कार्याची प्रशंसा केली.
मा. जगदीश कातकर यांनी विद्यार्थी, उपस्थित पालक आणि शिक्षकांना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते शिडवणे नं. १ शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी लिहिलेल्या स्वरचित कवितांचा ‘आनंदाची अक्षरफुले’ हा सुंदर संग्रह प्रकाशित करण्यात आला.
भेटीदरम्यान, मा. कातकर यांनी शालेय पोषण आहारांतर्गत बनवलेल्या गोड शिऱ्याचा आस्वाद घेतला आणि त्याच्या चवीची प्रशंसा केली. त्यांनी शाळेतील सर्व वर्गांची व परिसराची बारकाईने पाहणी केली. शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून त्यांनी कौतुक केले.
शेवटी, मा. रविंद्र जठार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आभार मानले, तर मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. ही भेट शाळा, विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली.