चिपी विमानतळावर उद्घाटनांची हॅट्रिक

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका
चिपी विमानतळावर येणाऱ्या विमानाचे सोमवारी पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपासून माजी पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांनीही उद्घाटन करून झाल्यानंतर नव्याने उद्घाटन करून उद्घाटनांची हॅट्रिक करण्यात आली असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
श्री उपरकर म्हणाले, चिपी विमानतळाचा पहिला नारळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना 1999 मध्ये फोडला. त्यानंतर श्री. राणे महसूल मंत्री असताना दुसऱ्यांदा व उद्योग मंत्री असताना तिसऱ्यांदा नारळ फोडण्यात आला. नारायण राणे यांनी तीन वेळा या विमानतळासाठीचा नारळ फोडला.
त्यानंतर दीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी चोरट्या पद्धतीने गणपतीची मूर्ती आणून उद्घाटनाचा प्रयत्न केला. तर त्यानंतर उदय सामंत पालकमंत्री असताना त्यांनीही विमानतळाचे उद्घाटन केले आणि या साऱ्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विमानतळाचे अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर आता या विमानतळावरून अनेकदा विमानसेवा सुरू झाली व बंद झाली. बंद झालेली सेवा पुन्हा सुरू झाली की नव्याने उद्घाटन करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे उद्घाटनांची हॅट्रिक किती वेळा करणार? ज्या जमीन मालकांना त्यावेळी दीडशे रुपये गुंठ्याने भाव देऊन जमीन घेण्यात आली. एमआयडीसीसाठीचा मूळ विषय असताना नंतर हीच जमीन आयआरबी कंपनीला 8000 रुपये प्रति गुंठा दराने देण्यात आली मग लोकांना काय मिळाले. या ठिकाणी रस्ता, पाणी, वीज या सुविधा उपलब्ध करावयाच्या होत्या. त्यापैकी किती सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अगोदर सर्व सेवा सुरळीत चालू करून मगच घोषणाबाजी करा. आतापर्यंत अनेकदा उद्घाटनांच्या हॅट्रिक झाल्या परंतु त्यातून काय साध्य झाले असा सवालही श्री उपरकर यांनी केला आहे.






