डॉ प्रफुल्ल शिंदे यांची गोपुरी आश्रमाला सदिच्छा भेट

आप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपुरीच्या माध्यमातून मोठे काम उभारले
डॉ. शिंदे यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्यानंतरच्या ग्रामीण विकासातील घडामोडीचे केंद्रस्थान गोपुरी होते. ग्रामीण स्वच्छता विषयी त्या काळात आप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपुरीच्या माध्यमातून मोठे काम उभारले. आत्ता प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात मोठा धोका पृथ्वीवरील जीव सृष्टीला निर्माण झाला आहे. प्लास्टिक वापराचे प्रतिमाणशी प्रमाण भरपूर वाढले आहे. इतर देशांमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर व विल्हेवाट याबाबत लोकांमध्ये चांगल्या जाणीवा विकसित झाल्या आहेत. त्या जाणिवा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या व खूप मोठ्या समुद्रकिनारा लाभलेल्या सिंधुदुर्गातील नागरिकांमध्ये व्हाव्यात यासाठी गोपूरीने पुढाकार घ्यावा असे डॉ. प्रफुल्ल शिंदे यांनी गोपुरी आश्रमातील भेटीदरम्यान सांगितले.
डॉ. शिंदे हे वरवडे गावचे रहिवासी असून 'स्विस स्कूल ऑफ बिझनेसॲण्ड मॅनेजमेंट' मधून त्यांनी पीएचडी केली आहे. मागील वीस वर्षे ते प्लास्टिक कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील शाश्वत भविष्यकालीन उपाय व आधुनिक ट्रेण्ड याबाबत देश-विदेशातील विविध उद्योग व सामाजिक संस्थांमध्ये मार्गदर्शन करत आहेत.
माणसांच्या शरीरात मायक्रो प्लॅस्टिक आढळून येत आहे. त्यामुळे PCOD, PCOS सारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या वाढिला मायक्रो प्लास्टिक कारणीभूतआहे. समुद्री जिवांच्या तसेच माशांच्या शरीरातही मायक्रो प्लास्टिक आढळत आहे. याबाबतच्या उपाय योजनांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महेंद्र खोत, व्ही. के. सावंत, सुरेश रासम, नितीन जावळे, प्रा.जयप्रकाश लब्दे, अमोल भोगले सदाशिव राणे विनायक सापळे नितीन तळेकर, राजेंद्र काळसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी व उपस्थितांचे स्वागत गोपुरीचे सचिव श्री बाळू मेस्त्री यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी गोपुरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुंबरकर यांनी सर्वांचे आभार मानले.