एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील “त्या” प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा

एसटीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात “क्लार्क सुट्टीवर असल्याने कारवाई प्रलंबित”

“ऑन ड्युटी” कर्मचाऱ्याला धमकी देत शिवीगाळ केल्याच्या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये भीती

कणकवली विभागीय कार्यशाळेत दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादा नंतर एका मेकॅनिकल वर्गातील “हेड कर्मचाऱ्याला” शिवीगाळ करत त्याला अरेरावी करून धमकावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात विभागीय कार्यशाळेच्या त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र ही तक्रार दिल्यानंतरही अद्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने कर्मचारी वर्गांमधून या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये देखील या घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून या संबंधित कर्मचाऱ्यावर चौकशी करून चार्जशीट देण्यासाठी एप्रिल महिन्यात घडलेल्या घटनेपासून आजपर्यंत क्लार्क नसल्याचे एसटीच्या प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे एसटीच्या रामभरोसे कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत उपलब्ध माहिती नुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कणकवली विभागीय कार्यशाळेमध्ये ही घटना घडली होती. दोन कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत वादावादी होत त्यातील एकाने शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे समजते. या धमकीच्या विरोधात सबंधित कर्मचार्‍याने एसटीच्या त्या विभागाच्या प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत एसटीच्या नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर धमकी देणारा कर्मचारी नियमबाह्य गेट मधून बाहेर पडला व त्यानंतर याची नोंद देखील गेटवरील कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच संबंधित धमकी देणारा कर्मचारी हा मद्यपान करून होता असे देखील लिखित स्वरूपातील तक्रारीत नमूद असल्याचे समजते. “ऑन ड्युटी” घडणाऱ्या या गंभीर प्रकाराबाबत तात्काळ दखल घेणे अपेक्षित असताना जवळपास वीस दिवस उलटून गेले तरी देखील याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले जाते का? असा सवल उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा आमचा खात्यांतर्गत विषय आहे. त्यामुळे याबाबत संबंधित कर्मचाऱ्याला चार्जशीट दिली जाणार असल्याचे सांगितले. मात्र वीस दिवस उलटून गेल्यानंतरही चार्जशीट न देण्याबाबत कारणाची विचारणा केली असता क्लार्क सुट्टीवर असल्याने चार्जशीट द्यायची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत असा प्रकार घडल्यानंतरही त्याबाबत गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने कर्मचारी वर्गामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!