कुडाळ एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

स्थानिक नागरिकांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतकडून एमआयडीसी प्लॉट नंबर जी ०२ मध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प (डेपो) सुरू करण्याच्या हालचाली ३ वर्षांपूर्वी चालू होत्या. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ, येथील कंपन्यांचे मालक,
एमआयडीसी असोसिशन आणि ग्रामपंचायत पिंगुळी यांनी विरोध केल्याने कुडाळ नगरपंचायतने यावर स्थगिती आणली होती.
मात्र, आता याच ठिकाणी पुन्हा कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जी ०२ प्लॉटची साफसफाई सुरू असून याबाबत पिंगुळीवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर जी ०२ भूखंडाच्या बाजूस औद्योगिक, वाणिज्य आस्थापने तसेच निवासी आस्थापने आणि प्राथमिक-माध्यमिक विद्यालय, नर्सिंग स्कूल आहेत. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होऊन भविष्यात या भागात रोगराई पसरू शकते. त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तसेच एमआयडीसीतील रहिवाशांचा विरोध असल्याने हा प्रकल्प एमआयडीसी भागात आणू नये अशी मागणी निवेदनाद्वारे कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!