एम.व्ही.डी. कलादालन ओसरगाव- कणकवली आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन उत्साहात संपन्न

कोकणभूमी ही साहित्यिक, कलावंतांची खाण आहे. या सिंधुभूमीत अनेक साहित्यिक, कलावंत, उद्योजक होवून गेले. नव्या पिढीला या ऐतिहासिक परंपरेची ओळख व्हावी, आणि नव्या कलावंतांना,नवोदित कवी-लेखकांना मुक्त विचारपीठ प्राप्त व्हावे या उद्देशाने एम. व्ही.डी. कलादालन आयोजित नुकतेच कोकणभूमी साहित्य कला संमेलन येथील माता वैष्णव देवी (एम. व्ही. डी. काॅलेज ओसरगाव) येथे कवी अजय कांडर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी एम. व्ही. डी. काॅलेजचे संचालक तथा संमेलनाचे संयोजक कॅप्टन विलास सावंत, प्रसिद्ध गायिका, लेखिका डाॅ.शकुंतला भरणे (गोवा), कृषिकेश रावले (अतिरिक्त पोलीस अधीक्षक ,सिंधुदुर्ग), कविता शिंपी (माध्यमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग), मुकुंद चिलवंत ( जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग) ,अजयकुमार सर्वगोड (कार्यकारी अभियंता), रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग) प्रा. हरिभाऊ भिसे (लोककलावंत) , किशोर कदम (मुख्याध्यापक ओसरगाव नं.१) आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
सुरूवातीला श्रीधर पाचंगे आणि सहकारी (रंगखांब ग्रुप) यांनी संबळवादन आणि समतेचे पाईक आम्ही या गीतगायनाने संमेलनास प्रारंभ झाला. कॅप्टन.विलास सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, सन्मानचिन्ह देऊन स्वागतपर सन्मान केला.
कवी अजय कांडर आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, कोकणभूमीतील अनेक ज्येष्ठ साहित्यिक ,कलावंतांच्या योगदानाची आठवण ठेवून भविष्यातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, नवोदित लेखक-कवी,कलावंतांच्या अभिवृत्तीला चालना मिळावी आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कलावंतांना मुक्तमंच प्राप्त व्हावा यासाठी एम. व्हि. डी. कलादालनच्या माध्यमातून कॅप्टन विलास सावंत यांनी हाती घेतलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी गोवा येथील प्रसिद्ध गायिका, लेखिका डाॅ.शकुंतला भरणे प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कोकणाला कलेचा वारसा लाभला आहे. त्याची प्रेरणा घेऊन नव्या गायक, कवींनी या क्षेत्रात करिअर म्हणून पहावे, केवळ नोकरीवर अवलंबून न राहता कला क्षेत्रात आपली प्रगती करावी, यासाठी स्वतंत्र संगीत अकादमी स्थापन करून नवोदित गायक कलावंतांना या संमेलनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावे.एम. व्हि डी. कलादालनासाठी आपण सहकार्य करेन असे त्यांनी यावेळी सांगितले. कॅप्टन सावंत यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचे कौतुकही त्यांनी केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, लोककलावंत प्रा. भिसे यांनीही संमेलनास आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
या संमेलनाच्या निमित्ताने विविध समुहनृत्यांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ओसरगाव शाळेने कोकणचा रुबाब भारी, राजं आलं राजं आलं, वागदे डंगळवाडी शाळेने शेतकरी नृत्य, फिजिओथेरपिस्ट काॅलेज ओसरगाव ने कोकणदर्शन नृत्य, एम.व्ही. डी काॅलेजची तेंडोलकर BBI. ग्रुपची लावणी तसेच दिपिका आंगणे ग्रुपचे नृत्य सादरीकरण झाले.
या दरम्यान विशेष कविसंमेलन संपन्न झाले. कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री मनिषा पाटील, आणि निमंत्रित कवी मधुकर मातोंडकर, निशिगंधा गावकर, सत्यवान साटम, रश्मी आंगणे, संदीप कदम, किशोर कदम, श्रवण वाळवे, तनवी मोहिते, सोनिया आंगणे यांनी आपल्या कविता सादर केल्या.
त्यानंतर कोकणच्या लालमातीत रुजलेल्या दशावतार कलेची प्रेरणा घेऊन बाल दशावतार स्पर्धा घेण्यात आली. या बाल दशावतार स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी येथील दशावतारी कलावंत संतोष रेडकर, दशावतारी संगीत संयोजक मयूर गवळी यांनी केले. श्री.मोरे यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले म्हणून तंयांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बाल दशावतार न्यू इंग्लिश स्कूल कळसुली (प्रथम क्रमांक विजेता) यांना आकर्षक चषच देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सिद्धभराडी बाल दशावतार ओसरगाव (द्वितीय क्रमांक) आणि विद्यामंदिर हायस्कूल कणकवली (तृतीय क्रमांक) या सहभागी बाल कलावंतांनाही गौरविण्यात आले.
यावेळी श्रीम. राजश्री सावंत यांनी सर्व बालकलावंतांना शुभेच्छा दिल्यात. गोवा येथील गायक श्रीवल्लभ पाडगांवकर यांनीही शुभेच्छा देवून एम. व्ही. डी. संगीत अकादमीत जास्तीत जास्त गायकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
कॅप्टन सावंत यांनी सर्व कलावंतांना सन्मानचिन्ह देवून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण साहित्य, कला संमेलनाचे बहारदार सूत्रनिवेदन प्रसिद्ध निवेदक राजेश कदम यांनी केले. तर प्रास्ताविक आणि आभार किशोर कदम यांनी मानले.