एसटीचा दरवाजा लॉक झाल्याने अनेक प्रवाशांना इमर्जन्सी दरवाजा व चालक केबिनमधुन उतरवले

काही अंतरावरून एसटी पुन्हा कणकवली बस स्थानकात

कणकवली भुईबावडा एसटी मधील प्रकार

महिला, वृद्धां सहित अनेकांना एसटीच्या भोंगळ कारभाराचा त्रास

कणकवली भुईबावडा या एसटीचा दरवाजा कणकवली बस स्थानका पासून काही अंतर एसटी गेल्यानंतर लॉक झाल्याने पूर्ण भरलेली एसटी अर्ध्या वरून परत माघारी फिरवण्याची नमुष्की एसटी प्रशासनावर आली. त्यात करून कणकवली आगारात एसटी दाखल झाल्यानंतर तेथील तंत्रज्ञांना देखील एसटीचा दरवाजा काही केल्या उघडेना. अखेर चालक केबिन मधून व अपघात काळात उघडल्या जाणाऱ्या इमर्जन्सी दरवाजातून एसटी प्रवाशांना खाली उतरावे लागले. एसटी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा वयोवृद्धांसह महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. इमर्जन्सी खिडकी व चालक केबिन मधून उतरताना एसटी प्रशासनाकडून पुरेशी व्यवस्था देखील केली गेली नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान या प्रकाराबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून डबघाईला आलेली एसटी नेहमीच्या रुटीन प्रवाशांना दिल्याने या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 5.45 वाजता सुटणारी कणकवली भुईबावडा ही एसटी आज नियमित वेळेपेक्षा जवळपास तासभर उशिराने सुटली. त्यात करून एसटी सुटल्यानंतर जानवली साकेडी फाटा या ठिकाणी एसटी एका महिला प्रवाशाला घेण्याकरता थांबवण्यात आली. मात्र यावेळी अनेक प्रयत्न करून देखील एसटीचा दरवाजा उघडेना. अखेर एसटी मधील काहींनी चालकाच्या केबिन मधून खाली उतरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. सायकळी 6.45 वाजता हा प्रकार घडला. अनेक प्रयत्न करून देखील एसटीचा दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्या महिलेला चालकाच्या केबिन मधून एसटीमध्ये घेत एसटी पुन्हा कणकवली बस स्थानकात नेण्यात आली. कणकवली बस स्थानकात तेथे कार्यरत असणाऱ्या तंत्रज्ञाने हर तऱ्हेने प्रयत्न करून एसटीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तरी देखील दरवाजा उघडेना. त्यानंतर अपघाता वेळी उघडली जाणारी इमर्जन्सी खिडकी व चालकाच्या केबिन मधून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. मात्र यावेळी महिला प्रवाशांसह वृद्धांना खाली उतरवण्यासाठी एसटी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था केली नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांनी याबाबत स्थानक प्रमुखांची भेट घेत ही एसटी पुन्हा या मार्गावरील प्रवाशांना न देता दुसरी सुस्थितीत असणारी एसटी द्या अशी मागणी केली. अनेक गाड्या या माघवारी करिता पंढरपूर येथे पाठविण्यात आल्याने एसटीची कमतरता असल्याचे या प्रवाशांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशांच्या आक्रमक भूमिके नंतर तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ ताटकळत राहिलेल्या प्रवाशांना दुसरी एसटी देण्यात आली. दरम्यान 7.50 वाजण्याच्या सुमारास पुन्हा ही एसटी नियोजित मार्गाने मार्गस्थ झाली. मात्र एसटी प्रशासनाच्या डबघाईला आलेल्या एसटीमुळे तसेच प्रशासनाच्या याबाबतच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना मात्र आज मनस्ताप सहन करावा लागला. जवळपास 50 या आसपास प्रवासी या एसटीतून प्रवास करत होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!