जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना पाठबळ मिळेल परंतु हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!
मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीत विविध विभागांची आढावा बैठक
मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने मार्गी लावण्याचा सूचना
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क अशा अनेक विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. दरम्यान यावेळी मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. कुवेसकर यांच्यासह मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढले पाहिजे. गस्तीसाठी लागणाऱ्या नौका लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा चालणार नाही. प्रसंगी लागेल त्या मदतीसाठी अधिकाऱ्यांना पाठबळ देऊ असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन मोगले यांच्याशी देखील संवाद साधून आढावा घेतला. देवगड जामसंडे नळपाणी योजनेबाबत देवगडचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याशी संवाद साधून देवगड जामसंडे येथील नळपाणी योजना सुरळीत सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यासाठी लागणारी मदत देखील आपल्याकडून होईल अशी विश्वासू ग्वाही देखील मंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच भुईबावडा घाट प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता श्री. घाडगे यांच्याशी भुईबावडा घाट तसेच अन्य महामार्गाच्या बाबतीत चर्चा केली. जे काय अपूर्ण काम असतील ती वेळीच मार्गी लावण्यात यावी, अशा सूचना देखील मंत्री ना. नितेश राणे यांनी केल्या.
दरम्यान सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे मोबाईल नेटवर्क. याबाबत देखील मंत्री मा. नितेश राणे हे काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. परंतु अद्यापही काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची असलेली समस्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत मंत्री ना. नितेश राणे यांनी SDM BSNL सिंधुदुर्ग चे अधिकारी श्री. जानु यांच्याशी चर्चा केली. तसेच मोबाईल भुईबावडा व शिवापुर याठिकाणी मोठ्याप्रमाणात मोबाईल नेटवर्क चा असलेली समस्या तातडीने मार्गी लावा अशा सक्त सूचना करण्यात आल्या.