कु.रजत ज्योती रविकिरण तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड

टेबल टेनिसच्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धामध्ये रौप्य पदक
टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच सटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. सदरच्या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. सदरच्या स्पर्धामध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग घेतला होता. कु.रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. अंतिम आठ संघामध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरीमध्ये चुरशीची झुंज देऊन संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघाने रौप्य पदक मिळवले. यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी रजतला मिळणार आहे.
कु.रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ.राहुल पंतवालावलकर , सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री.हेमंत वालकर आणि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकरच्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल, असे मत व्यक्त केले आहे. अ.शी.दे टोपीवाला हायस्कूल आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय च्या शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी रजतला शुभेच्छा दिल्या आहेत.





