तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग

मृत डाॅल्फिनला वाचविण्याचे मोठ्या डाॅल्फिनचे प्रयत्न झाले व्हायरल
आचरा-अर्जुन बापर्डेकर
निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात जे आपले कुतूहल जागृत करतात.तोंडवळी तळाशिल समृद्रात पर्यटकांना बोटींगचा आनंद घेत असताना दृष्टीस पडलेला मोठा डाॅल्फीन छोट्या डाॅल्फिनला पाण्यावर ढकलण्याचा प्रसंग मोबाईल मध्ये कैद झाला आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला . समुद्रातील हा दुर्मिळ देखावा पर्यटकांचे कुतूहल जागृत करुन गेला. याबाबत सागर जीव संशोधक डाॅ सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यावर डाल्फीनची ही मातृभावना,संरक्षण भावना,शोक व्यक्त करणे,सामाजिक बंध,किंवा त्यांच्या मध्ये निर्माण झालेला गोंधळ यापैकी कोणत्यातरी भावनेतून तळाशिल समुद्रात असा प्रकार दृष्टीस पडला असण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र बोटींगसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांसाठी. समुद्रातील हा अनोखा प्रकार अचंबित करणारा ठरला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तोंडवळी तळाशिल,आचरा येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फूलून गेले होते.आलेल्या पर्यटकांना डाॅल्फीन बघण्यासाठी समुद्रात
सफरी काढल्या गेल्या होत्या.तोंडवळी तळाशिल समृद्रात पाच सहा बोटींमधून कवडा राॅक परीसरात गेलेल्या पर्यटकांना समुद्रात एक मोठा डॉल्फिन छोट्या डाॅल्फीनला पाण्यावर ढकलत असल्याचे दृष्य दिसून आले.सदर दृष्य पर्यटकांचे कुतूहल जागृत करून गेल्याने हा प्रसंग अनेकांनी मोबाईल मध्ये शुट केला. काहींनी हा व्हिडिओ स्टेटसलाही ठेवल्याने हि घटना प्रचंड व्हायरल झाली.याबाबत सागर जीव संशोधक डॉ सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यावर डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी याबाबत अनेक तर्क व्यक्त केले.त्यांनी सांगितले की मोठा डॉल्फिन छोट्या मृत डॉल्फिनला उलटवण्याचा प्रयत्न करणे हे डॉल्फिन मध्ये पाहिले जाणारे सामान्य वर्तन आहे. हे वर्तन जर मोठा डॉल्फिन मृत्य डॉल्फिन ची आई असेल तर ते आपल्या पिलाला जिवंत करण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.ही तिची मातृभावना असते , डॉल्फिन अतिशय बुद्धिमान आणि सामाजिक बंधन ठेवणारे प्राणी आहेत त्यामुळे मोठा डॉल्फिन शोक व्यक्त करत असावेत . डॉल्फिन शोक व्यक्त करण्याची भावना ही पिल्लाला ढकलने जवळ राहणे किंवा कण्हणे अशाप्रकारच्या असतात. जर मोठा डॉल्फिन छोट्या मृत डाॅल्फिनचीआई नसली तरी ती कळपातील नाते जोडलेल्या डॉल्फिन साठी काळजी आणि सहानभूती दर्शवत असावी त्यांचे हे सामाजिक बंधन ते दाखवतात किंवा संरक्षण *भावनेतून मोठा डॉल्फिन मृत पिल्लाला भक्षकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यताही असू शकते.काही वेळा.
कळपातील सदस्याचा मृत्यू हा डॉल्फिन साठी भावनिक ताणतणाव निर्माण करू शकतो त्यामुळे असे वर्तनही दिसू शकते असे मत डॉ सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले .
एकूण पर्यटनासाठी तळाशील समुद्रात बोटींगला गेलेल्या पर्यटकांसाठी हा अनोखा प्रसंग मन हेलावून गेला.मुक्या प्राण्यांमधील या भावभावना अनोखी सामाजिक भावना डाॅल्फिनच्या या प्रसंगातून अनेकांनी अनुभवली.