वराडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
तब्बल ३५ वर्षानंतर मित्र- मैत्रिणी एकत्र
वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या शाळेच्या एस. एस. सी. मार्च १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दि. ९.११.२०२४ रोजी तातूंची वाडी – पराड या निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्यासाठी शाळेचे माजी शिक्षक आदरणीय हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणारे श्री. आकेरकर सर, मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करणारे श्री. फणसेकर सर, इंग्रजी विषय शिकवणारे श्यामराव पाटील सर, विज्ञान शिकवणारे मात्र अध्यात्माचे महत्त्व सांगणारे श्री. तांबिटकर सर, भूगोल विषय शिक्षक श्री. सामंत सर, शाळा नियोजित वेळेत भरवणारे शिपाई मामा श्री. जांभवडेकर आणि सर्वंच विद्यार्थ्यांमध्ये मिसळणारे श्री. महादेव वाईरकर मामा उपस्थित होते.
पहिल्या सत्रात कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. राष्ट्रगीत, ईशस्तवन व स्वागत गीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मागील काळात शाळेच्या काही शिक्षकांचे, वर्गातील काही सहकार्यांचे आणि परिवारापैकी ज्यांचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सौ. अनिता शिंदे हिने सूत्र संचलन केले. ३५ वर्षानंतर एकत्र आल्याने सर्वांनी आपली ओळख व कार्याची माहिती देत मनोगत व्यक्त केले. श्री. तांबिटकर, श्री. फणसेकर सर, श्री. सामंत सर यांनी आपल्या शैलीत आठवणी सांगितल्या. श्री. आकेरकर सरांनी मात्र अतिशय मिश्कीलपणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मात्र सर्व विद्यार्थ्यांचे हसून पोट दुखले. श्री. पाटील सरांनी इंग्रजी शिकवता शिकवता मालवणी आत्मसात केल्याचे आवर्जून नमूद केले. सौ. अनिता शिंदे हिने स्वरचित कविता सादर केली.
उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे, तातूंची वाडी व्यवस्थापनाचे, मेळावा संपन्न करण्याकरिता मेहनत घेणार्या सहकार्यांचे आणि मित्रांच्या भेटीच्या ओढीने उपस्थित राहिलेल्या सर्वांचे श्री. सुहास हिर्लेकर यांनी आभार व्यक्त केले.
दुसर्या सत्रात दुपारी शाळेला भेट देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. देवयानी गावडे, संस्थेचे सचिव मा. श्री. सुनील नाईक, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक मा. श्री. ऋषिकेश नाईक यांचे १९८९ च्या बॅचच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. विजय चव्हाण याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या वाचनालयास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
शाळा व संस्था यांनी मिळून १९८९ च्या बॅचचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार केला. यावेळी सर्वानुमते श्री. देवेन उर्फ पपू ढोलम यांनी सत्काराचा स्विकार केला. सर्वच विद्यार्थी आपले वर्ग शोधत आपल्या शालेय आठवणी जागृत करत होते. शाळेचे संस्थापक स्व. श्री. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यासमोर समूहफोटो घेऊन पुन्हा तातूंची वाडी याठिकाणी प्रस्थान केले.
तिसर्या सत्रात तातूंची वाडी येथे संगीत खुर्ची, गीत गायन, गाण्यांच्या भेंड्या यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले. गीतगायनमध्ये श्री. हेमंत माळकर, श्री. बाबा सातार्डेकर, श्री. रामदास हंजणकर, श्रीम. सुवर्णा नांदोसकर यांनी गाणी सादर केली. तसेच इतर स्पर्धांमध्ये सर्वच उपस्थित सहकार्यांनी सहभाग घेतला होता. संगीत खुर्ची स्पर्धेत तृतीय क्र. श्री. पपू ढोलम, द्वितीय क्र. श्री. किशोर उर्फ केके कुणकवळेकर आणि प्रथम क्रमांक श्रीम. सुवर्णा नांदोसकर यांनी पटकावला.
शेवटच्या सत्रात छोटेखानी कार्यक्रम घेऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. यापुढे मेळाव्यासाठी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे तसेच इतर मित्रमैत्रिणींचा शोध घेण्याचे ठरवून मेळाव्याची सांगता करण्यात आली.