हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने सरंबळ येथे २४ गायत्री महायज्ञाचे आयोजन
१२ मार्चला होणार पूर्णाहुतीने सांगता
कुडाळ : शांतीकुंज, हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार, गायत्री चेतना केंद्र (मुंबई) आणि गायत्री परिवार (कुडाळ) यांच्या वतीने तालुक्यातील सरंबळ येथील सरसोली धाम येथे २४ कुंडी गायत्री महायज्ञाचा प्रारंभ ९ मार्च या दिवशी भावपूर्ण वातावरणात झाला असून १२ मार्च या दिवशी या महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे.
९ मार्च या दिवशी सरसोली धाम परिसरात दुपारी कलशयात्रा आणि सद्ग्रंथ यात्रा काढण्यात आली. सायंकाळी युग संगीत, ‘आद्यशक्ती, युगशक्ती गायत्री’, या विषयावर प्रवचन झाले. १० मार्च या सकाळी ७ वाजल्यापासून ध्यान, प्रज्ञायोग, देवपूजन, गायत्री महायज्ञ, दुपारी युग संगीत, ‘महिलांनो जागे व्हा, स्वत:ला ओळखा’ विषयावर प्रवचन झाले. ११ या दिवशी सकाळी ध्यान, प्रज्ञायोग, गायत्री महायज्ञ, संस्कार परंपरा, सायंकाळी दीपयज्ञ, प्रवचन, असे कार्यक्रम होणार आहेत. १२ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता ध्यान, प्रज्ञायोग, संस्कार गायत्री महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे. या पुढील महायज्ञ १३ मार्चला राजापूर, १७ मार्चला रत्नागिरी आणि २२ मार्चला चिपळूण येथे होणार आहे.
- महायज्ञाचा दिनक्रम :
या प्रत्येक यज्ञाच्या पहिल्या दिवशी कलशयात्रा, दुसर्या आणि तिसर्या दिवशी २४ कुंडी यज्ञ अन् चौथ्या दिवशी पूर्णाहुतीने यज्ञाची सांगता, असे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय सकाळी ध्यान, योग आणि सायंकाळी १ सहस्र दिव्यांचा दीपयज्ञ, तसेच अन्ये कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये अवश्य भाग घ्यावा आणि संस्कृती जागरणाचे कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन गायत्री परिवाराकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ