आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटकाचा शुभारंभ

सनातन विसंवाद हे नाटकाचे आहे कथाबिज
गेले तीन महिने तालीम सुरू असलेल्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ‘हत्ती, घूस, रेडा ,गेंडा’ या नव्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रतिष्ठानच्या रंगमंचावर कणकवली आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या रसिकांच्या उदंड गर्दीत उत्साहाने सादर झाला.
शुभारंभाच्या प्रयोगाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी-नाटककार-लेखक-रंगकर्मी डॉ. राजीव नाईक, प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. प्रवीण बांदेकर आणि रसिकांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड उपस्थित होते.
डॉ. राजीव नाईक, श्री प्रवीण बांदेकर, कुडाळ येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री चंदू शिरसाट, श्री अजय वैद्य, बांधकाम व्यावसायिक श्री सुनील पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले.
सीरियन नाटककार सादल्ला वानौस यांच्या ‘Oh Elephant, The King of Time’ या नाटकापासून प्रेरित होऊन ‘हत्ती, घूस, गेंडा,रेडा’ या नाटकाची संकल्पना दिग्दर्शक श्री केतन जाधव यांनी विकसित केली आहे. श्री योगेश्वर बोंद्रे यांनी संहिता लेखन केले आहे.
सत्ताधीश आणि सामान्य प्रजा यांच्यातील असलेला सनातन विसंवाद हे या नाटकाचे कथाबीज आहे. समकालीन संदर्भ घेत विनोदाच्या माध्यमातून या विसंवादावर केलेले तिरकस भाष्य वेळोवेळी रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेले.
श्री शशिकांत कांबळी आणि सहकाऱ्यांचे पार्श्वगायन, संगीत साथ, श्री नामानंद मोडक यांचे उचित नेपथ्य, श्री शाम चव्हाण आणि धनराज दळवी यांची प्रकाशयोजना, प्रणाली चव्हाण यांनी केलेली वेशभूषा यामुळे नाटक अधिक रंगतदार झाले.
ललित कला केंद्र पुणे येथे प्रशिक्षित दिग्दर्शक श्री केतन जाधव यांनी शारीरिक हालचाली, गाणी, संगीत आणि अभिनेते यांचा सुयोग्य मेळ घालत नाटकाचा आशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवला.
सुदिन कदम, विकास कदम, दीक्षा पुरळकर, प्रतीक्षा कोयंडे, सिद्धेश खटावकर, कांचन खानोलकर, महेश चिंदरकर, राकेश काणेकर आणि शरद सावंत या कलावंतांनी पूर्ण ऊर्जेने अभिनय करत रसिकांना खिळवून ठेवले.
प्रयोगानंतर सर्व कलावंतांचा सत्कार करताना डॉ . राजीव नाईक यांनी “असे नाटक कणकवलीत निर्माण होणे हे मी महत्त्वाचे मानतो. माझा विद्यार्थी असलेल्या केतन जाधव या दिग्दर्शकाच्या या प्रयोगाने माझ्यातील गुरू संतुष्ट आहे” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
” माझ्या कादंबरीवर आधारित नाटक अथवा चित्रपट कुणालाही करता येऊ नये अशी माझी आत्तापर्यंतची धारणा होती. पण हे नाटक पाहिल्यावर मलाही नाट्यलेखन करावे असे वाटू लागले आहे” अशी प्रतिक्रिया प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली.
या प्रयोगाला प्रतिष्ठानच्या पहिल्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले श्री प्रकाश कामत सपत्नीक उपस्थित होते. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे श्री चंदू शिरसाट, वैद्य सर, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. आकेरकर, केदार सामंत, कणकवलीतील डॉ. नितीन शेट्ये, डॉ. प्रशांत मोघे, तळेरे येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी, मित्र परिवार शिरगावचे अत्तार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या प्रयोगाला मिळालेल्या या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे संस्थेला या नाटकाचे महाराष्ट्रात सर्वदूर प्रयोग करण्यासाठी बळ लाभले आहे अशी भावना कार्याध्यक्ष ॲड.एन.आर.देसाई व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यक्त केली .





