तोंडवली मध्ये देवगड निपाणी राज्य मार्गाच्या ठेकेदाराकडून बेकायदेशीर खडी उत्खनन

अनेक नियमांचा भंग केल्याने खडी उत्खननाला तात्काळ आळा घाला
माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
तोंडवली ग्रामस्थांची उपोषण स्थळी घेतली भेट
कणकवली तालुक्यातील तोंडवली गावात देवगड निपाणी राज्य मार्गाचे काम सुरु असताना ठेकेदाराने रस्त्यालगत क्रेशर, क्वारी सुरु केल्याने दगड काढण्यासाठी सुरुग खोलवर जाऊन मोठे स्फोट घडवत आहेत. यामुळे गावातील सुमारे ५१ घरांना तडे गेलेले आहेत. त्याचप्रमाणे गावाचे ग्रामदैवत श्री पावणाई देवी मंदिर असलेल्या देवळाला सुरुंगाचा त्रास झालेला आहे.सदर सुरुंगामुळे व गावातील जनतेच्या विहिरीचे पाणीपातळी खाली गेली आहे. त्याचचरोबर लगत असलेल्या गाव नकाशावरील वहाळाचे पाणी कमी झालेले आहे. त्यामुळे भविष्यात त्या गावातील बाडीतील लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष व टंचाई जाणवणार आहेत. पुढील मे महिन्यात याची झळ अधिकच जाणवणार आहे. याबाबतची तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, क्रेशर च्या धुळीमुळे प्रदुषण होऊन शेतीचे व क्रेशरच्या धुळीने आंबा व काजू बागायतीचे नुकसान झालेले आहे. सुरुंग लावलेल्या स्फोटामुळे जिवितहानी सुद्धा होण्याची भीती आहे. त्यापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर लोकवस्ती आहे.
ठेकेदाराने आपल्या क्रेशर आणि सामान ठेवण्याच्या ठिकाणी कंपाऊंड घातले नसल्याने तेथील ऑईलमुळे त्या ठिकाणी गावातील गुरेढोरे जाऊन ५ जनावरे दगावली आहेत. अशा प्रकारे गावाला विविध प्रकारचा त्रास होत असल्याने गावातील लोकांनी सदर क्रेशर चे उत्खनन थांबवून आंदोलन केलेले आहे. क्रेशर व उत्खननाची परवानगी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासामुळे त्याला मुदत वाढ देण्यात येऊ नये. विवरणपत्र अ मधील दिलेल्या परवानगीतील ५ नंबरचा मुद्दा सूर्य अस्तानंतर सुरुंग लावून भंग केलेला आहे. विवरणपत्र अ मधील बऱ्याच अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले असल्याने विवरणपत्र अ मधील अट नंबर १६ च्या मुद्याप्रमाणे ग्रा. पं. ग्रामस्थांच्या उपस्थित झालेल्या तक्रारीवरुन ५१ घरांना तडे गेलेले आहेत, त्यामुळे सदर परवानगी ग्रा. पं. सभेच्या ठरावाप्रमाणे रद्द करण्यात यावी. तसेच विवरणपत्र व मधील ११ नंबरच्या मुद्द्याचे उल्लंघन झालेले आहे. तलाठी आणि सर्कल यांच्या अहवालात शाळा, मंदिर, जलाशयाचा असलेला वहाळ नमूद केलेला नाही. म्हणून विवरणपत्र अ व ब मधील अनेक अटी-शर्तीचा भंग केलेला असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार व ग्रामसभेनुसार अन्य व तात्पुरत्या पद्धतीने गौण खनिज उत्खनन परवाना आदेश रद्द करण्यात यावा. त्याचप्रमाणे ५१ घरांना च मंदिरांना तडे जाऊन नुकसान झालेले आहे त्याचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे. तसेच ग्रामस्थांच्या झालेल्या घरांची नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरुन व्हावी, या सर्व त्रासाच्या विरोधात दि. १९/०४/२०२८ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांनी एकमतांनी उत्खननाविरुद्ध ठराव केलेला आहे. या ठरावानुसार संबंधितांना उत्खननाची मुदतवाढ किंवा परवानगी देण्यात येऊ नये, एखाद्या स्थानिक प्राधिकरणाने व स्थानिक संस्था व प्राधिकरणाने असा ठराव केला तर पुढील परवानगी देण्यात येऊ नये, अशी तरदूत आहे.
जरी सदर ग्रामस्थांच्या ताकारीमुळे व उत्खनन अन्य ठिकाणी करुन क्रेशर मुळे होणारे धुळीचे प्रदुषण थांबवण्यासाठी पर्यावरण व प्रदुषण नियमाप्रमाणे दिवसा क्रेशर चालू ठेवून उडणाऱ्या धुळीवरती नियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात यावा अशी मागणी श्री. उपरकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. कोपरकर यांनी आज या उपोषण स्थळी ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली.





