केवळ एनसी नको, तर संशयितांवर कठोर कलमान्वये एफआयआर दाखल करा !

कुडाळ कचरा डेपो आग प्रकरणी आमदार निलेश राणेंचे पोलिसांना निर्देश

कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CO) श्री. औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. दरम्यान, ही आग लावली गेली असल्याच्या संशयावरून केवळ ‘एनसी’ नको, तर संशयितांविरुद्ध तत्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश आमदार राणे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
कचरा डेपोला बुधवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्न सुरू असले, तरी या धुरामुळे स्थानिक जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी मुख्याधिकारी श्री. औंधकर यांच्या बेजबाबदार कामाचे पाढे वाचले. विकासकामांचा कोणताही ठोस आराखडा नसल्याने आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदारांचा पारा चढला.
आपण प्रशासकीय अधिकारी आहात, जनतेच्या अडचणी दूर करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे, अशा शब्दांत आमदार राणे यांनी श्री. औंधकर यांना सुनावले. तसेच, कुडाळच्या विकासासाठी आणि समस्या निवारणासाठी आजवर नेमका काय आराखडा तयार केला आहे, याची माहिती आठ दिवसांत नगरसेवकांची बैठक घेऊन सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
कचरा डेपोला आग कोणी लावली नसावी ना, या संशयाने कुडाळ पोलिसांत केवळ ‘एनसी’ दाखल करण्यात आली होती. मात्र, आमदारांनी यावर तीव्र आक्षेप घेत कुडाळ मुख्याधिकारी श्री. औंधकर यांना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पीआय राजेंद्र मगदूम यांना तातडीने संपर्क केला. “केवळ एनसी नको, तर संशयितांवर कठोर कलमान्वये एफआयआर दाखल करा,” असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासोबत कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका संध्या तेरसे, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, अक्षता खटावकर, नगरसेवक अभी गावडे, विलास कुडाळकर, निलेश परब तसेच काका कुडाळकर, संजय पडते, राकेश कांदे, राजवीर पाटील, गणेश भोगटे, बाबा परब आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!