‘शक्तीपीठ’ च्या नव्या आराखड्यामुळे व्यपार व पर्यटन धोक्यात !

ठाकरेसेना शिवसेना स्टाईलने संघर्ष करणार
माजी आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद
शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे कोकणच्या व्यापार आणि पर्यटनाचे कंबरडे मोडणार असून, हा प्रकल्प कोकणवासीयांच्या हिताचा नसेल तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक यांनी आज सायंकाळी उशिरा कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन नकाशावर बोट ठेवत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा महामार्ग राधानगरीपर्यंत येतो आणि तिथून थेट गोवा-पत्रादेवीकडे वळतो. याचा अर्थ मुंबईतून निघालेला प्रवासी किंवा पर्यटक कोकणात पाऊल न ठेवता थेट सीमेबाहेर पडणार आहे.
आपण महामार्गाच्या विरोधात नाही हे सांगतानाच, पण जर हा मार्ग कोकणला वळसा घालून जाणार असेल, तर येथील व्यापाराचे काय? कोकणच्या बाजारपेठा ओस पडणार असतील तर हा विकास कोणासाठी? असा संतप्त सवाल यावेळी वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
कोकणची अर्थव्यवस्था पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर अवलंबून आहे. मात्र, या महामार्गामुळे पर्यटक अंतर्गत कोकणात न येता बाहेरूनच निघून जातील. यामुळे हॉटेल व्यवसाय, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन स्थळे दुर्लक्षित राहून कोकणाचे अपरिमित नुकसान होईल, अशी भीती व्यक्त श्री. नाईक यांनी व्यक्त केली.
सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांवर हल्लाबोल करताना वैभव नाईक म्हणाले, या महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमका काय फायदा आहे? येथील व्यापार धोक्यात घालून कोणता ‘विकास’ साधला जात आहे? सिंधुदुर्गवासीयांच्या पोटावर पाय देऊन जर महामार्ग पुढे रेटला जात असेल, तर शिवसेना शांत बसणार नाही. कोकणच्या अस्तित्वासाठी आणि व्यापारासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,असा ठाम निर्धार यावेळी वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला अमरसेन सावंत, राजन नाईक, बबन बोभाटे व कार्यकर्ते उपस्थित होते.





