कुडाळात न.प.च्या कचरा डेपोला भीषण आग

दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल
आगीचे नेमके कारण कळू शकले नाही
कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला.
आगीची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, श्रेया गवंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकप्रतिनिधींनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगीचा धूर आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, आग लवकरात लवकर विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग विझवताना अडचणी येत असल्याचे समजते.





