बायोमेट्रिक हजेरीचे शासन आदेश न मानणा-यांवर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्त्यांचे दोडामार्ग पंचायत समितीसमोर बुधवारपासून उपोषण
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली व हालचाल रजिस्टर ठेवण्याचा शासन आदेश असूनही ते अद्याप ठेवण्यात आलेले नाही.त्यामुळे शासनाचे आदेश न मानणा-या संबधित कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव (घोटगे ) व जेनिफर लोबो (साटेली भेडशी ) बुधवारी (ता. २) सकाळी दहा वाजल्यापासून येथील पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाच्या दि.०५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणेबाबत निर्देश दिले आहेत. मात्र त्यांनी शासनस्तरावरील आदेश धुडकावून जनतेला मेटाकुटीस आणले आहेत. बांधकाम कामगारांची तर मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रास देत आहेत. याप्रकरणी आपल्याकडूनही अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा आणि शासन आदेश धुडकावण्या प्रयत्न होत आहे असे आम्हाला दिसून आले आहे.त्यामुळे बुधवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती दोडामार्ग येथे सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या
@प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात तत्काळ बायोमेट्रिक थंब मशीन बसवून कर्मचारी हजेरी नुसारच पगार अदा करण्यात यावा.
@प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवण्यास बंधनकारक करावे.
@ ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांची दिशाभूल करून त्यांना त्रास देणे थांबवावे.
@जे ग्रामसेवक शासन आदेश मानत नाहीत त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी.