दोन ग्राहकांचे वीजबिल ४० हजार रुपये
‘ तिलारी ‘च्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने विजेचा गैरवापर होत असल्याची चर्चा
कोकण नाऊ l News Channel
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
तिलारी प्रकल्पासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारकडून येणारा निधी अधिकारी,ठेकेदार आणि मर्जीतील व्यक्तींसाठी खर्च होत असल्याची चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे. तिलारी प्रकल्प सरकारसाठी पांढरा हत्ती तर ठेकेदार व अधिकाऱ्यांसाठी ‘वाहती गंगा ‘ आहे.त्यात अनेकांनी हात धुऊन घेतले आहेत. तिलारी प्रकल्पाच्या कोनाळकट्टा येथील मिनी कॉलनीत केवळ दोन वीज ग्राहक आहेत आणि वीज बिल येते ३५ ते ४० हजार रुपये.घरगुती वापरासाठी एवढे बिल आकारले जाणे अशक्य आहे.काहींच्या मते मिनी कॉलनीमधून ही वीज बेकायदेशीररित्या दुसऱ्याच ठिकाणी नेली जाते, तीही संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने.यामुळे सरकारी पैशांचा अपव्यय सुरू आहे आणि वीज बिलाची थकबाकी मात्र वाढते आहे.
नुकतेच १५ ऑगस्टला तिलारी प्रकल्पाने संपादित केलेल्या जागेत बेकायदेशीर क्रशर उभारण्यास व सुरू ठेवण्यास सहकार्य करणाऱ्या तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते.महिनाभरात त्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्याना देण्यात आले असले तरी कारवाई होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यानंतर पुन्हा दोघांचे वीज बिल ३५ ते ४० हजार कसे येते यावर चर्चा सुरू झाली आहे.यातही संबंधित अधिकाऱ्यांना हात असून मिनी कॉलनीमधील वीज इतरत्र बेकायदेशीर वापरण्यास ते अधिकारी सहकार्य करत असल्याचा आरोप होतो आहे.
त्याबाबत चौकशी करू: बुचडे
यासंदर्भात तिलारी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी मोठ्या रकमेचे बिल येत असल्याचे मान्य केले; मात्र कुणी तेथून इतरत्र नेऊन बेकायदेशीर वीज वापरत आहे अथवा नाही याबाबत चौकशी करण्यात येईल असे सरकारी पठडीतील उत्तर दिले.
या अधिकाऱ्यांवर कारवाई हवीच
तिलारी प्रकल्पाने संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून कायमस्वरूपी शेती बागायती करणे,बेकायदेशीर क्रशर उभारणे असे प्रकार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोस सुरू आहेत.अधिकाऱ्यांना कुणी प्रश्न केला की त्यांचे चौकशी करू असे उत्तर ठरलेले असते.’ मनी, मसल आणि पॉलिटिकल पॉवरच्या जीवावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या धन दांडग्यांना बळ देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी.त्यासाठी काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही ठेवली आहे.