श्रद्धा सतीश पाटकर हिला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
श्रद्धा हिच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवा ( युवती )पुरस्कार सन २०२०-२१ चा पुरस्कार हुंबरट येथील श्रद्धा सतिश पाटकर हिला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. श्रद्धा पाटकर हिने शाळाबाहेरची शाळा हा अत्यंत स्तुप्त उपक्रम राबविला होता. कोरोना काळ सुरु झाल्यापासून तिने मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून विविध उपक्रम राबविले. अनुभव शिक्षा केंद्रासोबत साथी म्हणून तिने दोन वर्ष काम पहिले. या कालावधीमध्ये तिने चिपळूण येथे पुरग्रस्थाना मदत करण्यात मोलाचा वाट उचलला होता. सोबतच तरुणांच्या कौशल्यांमध्ये वृद्धी होण्यासाठी एक दिवशीय शिबिरे, स्पर्धा, अभ्यास दौरा तसेच त्यांच्या प्रश्नांना घेऊन ठोस भूमिका राबविली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल , सिंधू रक्तामित्र सिंधुदुर्ग अश्या संस्था मध्ये मोलाची भूमिका बजावली. तिच्या या कामगिरी बद्दल आणि पुरस्काराबद्दल महाराष्ट्र स्तरावर गौरव उदगार काढले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम १०,००० रुपये असे असून या सोहळ्या प्रसंगी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, सिंधुदुर्ग , अपर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले, सिंधुदुर्ग , जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस उपस्थितीत होते.
दिगंबर वालावलकर, कणकवली