सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्तीला पोषक व्यवस्था राबविण्यासाठी खास नियोजन करावे
नशाबंदी मंडळ च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने “करू व्यसनमुक्तीचे खंडन, हेच स्वातंत्र्याचे रक्षाबंधन!” नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने या अभियानाची सुरुवात मा. सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून करण्यात आली.
समाजाचे व्यसनांपासून रक्षण करावे संविधान कलम ४७ नुसार वाढत्या व्यसनांना प्रतिबंध घालून, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणे व्यसनमुक्त घोषित कारावीत. त्या ठिकाणी व्यसनमुक्त भाग दर्शविणारे फलक लावले जावेत. तसेच केंद्र शासनाची ‘नशा मुक्त भारत’ चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील दहा दहा विद्यार्थी निवडून त्यांचे व्यसनमुक्ती दूत अथवा प्रहरी क्लब सारखे ग्रुप तयार करून त्यांच्या माध्यमातून नशा मुक्त भारत अभियानाची मोहीम घराघरात पोहोचविल्यास नशेच्या विरुद्ध जनमत तयार होऊन व्यसनमुक्तीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी सिंधुदुर्गातील प्रशासनाच्या विविध विभागाचे सहकार्य घेऊन योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक आखणी करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मा. किशोर तावडे यांना देऊन व्यसनमुक्तीची राखी बांधून संविधान कलम ४७ची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मकरंद देशमुख यांनाही संविधान कलम ४७ ची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पितां मुंबरकर, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संयोजन समितीचे अध्यक्ष श्रावणी मदभावे, पदाधिकारी स्मिता नलावडे, मेघा गांगण, सुप्रिया पाटील, श्रध्दा कदम,रिमा भोसले, राजेंद्र कदम, पत्रकार महेश सरनाईक, सतीश मदभावे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
व्यसन विरोधी उपक्रम राबविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागाकडून सहकार्य केले जाईल तसेच नशाबंदी मंडळा कडून आलेल्या निवेदनाची आपण पूर्तता करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वांनी मिळून व्यसनमुक्तीची शपथ घेतली. नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत सर्वांनी नशा मुक्तीची प्रतिज्ञा घ्यावी व त्याप्रमाणे कृती करावी ही मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात नशाबंदी मंडळाकडून जिल्हाधिकारी यांच्या समावेत सामुदायिक नशा मुक्तीची शपथ घेऊन सुरुवात करण्यात आली.
कणकवली, प्रतिनिधी