ठाकरे शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर १३ ऑगस्टला सिंधुदुर्गात

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती

कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवाराबद्दल मते जाणून घेणार

ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आ. मिलिंद नार्वेकर हे शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत १३ व १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. या निमित्ताने १३ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका व विधानसभा उमेदवारा संदर्भात चर्चा करणार आहेत. आ. नार्वेकर यांच्या दौऱ्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आ. नार्वेकर यांच्या दौऱ्याचा ठाकरे शिवसेना संघटना वाढीसाठी फायदा होणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ठाकरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, नाटळ विभाग प्रमुख प्रदीप सावंत, सी. आर. चव्हाण आदी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे त्यानुसार ठाकरे शिवसेना सचिव आ. मिलिंद नार्वेकर हे मंगळवार १३ ऑगस्टला सिंधुदुर्गात येणार आहेत. यानिमित्ताने सावंतवाडी मतदार संघातील सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील आराध्य हॉटेल येथे बैठक होणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता कुडाळ येथील लेमन ग्रास हॉटेल येथे कुडाळ मालवण मतदारसंघातील तर दुपारी २.३० वा. कणकवली येथील विजय भवन येथे कणकवली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारा संदर्भातील मते ऐकून घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता आ. मिलिंद नार्वेकर हे रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!