सौ. प्रणिता तेली – बांबुळकर यांना 2024 चा राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान
कणकवली/मयूर ठाकूर
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ज्ञानदानाच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रत्येक वर्षी पुणे येथे संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीचा राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार माध्यमिक विद्यालय नाटळ या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रणिता नंदादीप तेली - बांबुळकर यांना रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे येथे सन्मानपत्र व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करीत बहाल करण्यात आला.
सौ. प्रणिता तेली - बांबुळकर या गेली दहा वर्षे विज्ञान विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून माध्यमिक विद्यालय नाटळ येथे कार्यरत असून आता मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या अध्यापना सोबतच विविध विषयांवर आधारित उपक्रम त्या प्रशालेत राबवितात. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा, विज्ञान नाटयोत्सव अशा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. सोबतच विविध कलात्मक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
त्यांच्या या सन्मानाबद्दल राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबईचे अध्यक्ष श्री.भालचंद्र सावंत, सेक्रेटरी श्री. निलेश सावंत , शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे.