वीज वितरण च्या मांडलेल्या समस्या सुटल्या नाहीत तर गाठ माझ्याशी

आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
कामचुकार अधिकाऱ्यांना देश विदेशात पाठवा, राणेंचा खोचक टोला
कणकवली तालुक्यामधील वीज वितरण च्या समस्या या येत्या पंधरा दिवसात सुटायला सुरुवात झाली पाहिजे. आता माझ्यासोबत बसलेले अधिकारी हे जबाबदार आहेत. समस्या जर सुटल्या नाहीत व तालुक्यातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या पुन्हा माझ्यापर्यंत आल्या तर त्याला जबाबदार आता उत्तर देणारे अधिकारी राहतील. व त्यानंतर माझ्याकडून तक्रारी करून संबंधितांचे निलंबनापर्यंत कारवाई केली जाईल असा थेट इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील वीज वितरणच्या समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. कणकवलीत प्रहार भवन येथे कणकवली तालुक्यातील वीज वितरण च्या समस्या संदर्भात आमदार राणेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधीक्षक अभियंता व त्याखालील अभियंते उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील सरपंचांनी प्रत्येक झोन निहाय समस्यांचा पाढा वाचला. यावेळी अधिकारी फोन उचलत नाही ही नित्याची समस्या मांडण्यात आली. तर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे हे केवळ काम करतो असे गोड बोलून आश्वासन देतात मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. कणकवली ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता राणे यांच्याकडून देखील कामांबाबत सातत्याच्या तक्रारी असतात असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दरवेळी कनेडी, सांगवे भागातील कनिष्ठ अभियंता यांच्याकडून फोन उचलले जात नाहीत व दिलेली आश्वासने पूर्तता होत नाहीत अशी समस्या त्या भागातील सरपंचांनी मांडल्यावर आमदार नितेश राणे यांनी या अधिकाऱ्याकडे जर देश विदेशातील कामे असतील तर त्यांना ती करू द्या. इथे नवीन अधिकारी द्या अशी सूचना दिली. त्यानंतर मात्र अनेक अधिकाऱ्यांच्या बदलीचीच मागणी सातत्याने समोर आल्याने महावितरण साठी हे भूषणावाह नाही. यात सुधारणा झाली पाहिजे. प्रश्न मांडल्यावरच कामे होणार ही मानसिकता अधिकाऱ्यांनी सोडा. व लोकांच्या समस्या सुटण्यासाठी आपण आहोत याची जाणीव ठेवून काम करा. असे खडे बोल वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना सुनावले. तुमच्या तांत्रिक भाषेतील उत्तरे आम्हाला नकोत. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारतात आमची लाईट केव्हा येणार? त्यावेळी तुम्ही लोकांना तांत्रिक भाषेतील उत्तरे देऊन चालणार नाही असा इशारा आमदार राणेंनी दिला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली