पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधील दोघांना वाचवले
दोघेही आसगाव चंदगड येथील
मदतीसाठी गेले आणि अडकले ; साटेली भेडशी येथील घटना
पोलिसांची अतुलनीय कामगिरी;स्थानिकांची मदत
साटेली भेडशी येथील खालच्या बाजारात पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी गेलेले जीपमधील दोघेजण अचानक वाढलेल्या पाण्यामुळे कारमध्ये अडकून पडले. अखेर त्या त्या दोघांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. दोघेही चंदगड तालुक्यातील आसगाव, नांदोडे येथील आहेत तर त्यांनी ज्याला वाचवले तो कारचालक उत्तरप्रदेश मधील आहे.
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी (ता. १)सकाळी साडेपाच वाजता साटेली भेडशी पुलावर पुराचे पाणी आलेले आहे व पुलावर दोन युवक कार मध्ये अडकून पडले आहेत अशी माहिती मिळाली.त्यामुळे श्री. ओतारी यांनी पोलिस हवालदार विठोबा सावंत, सुतार,पोलिस शिपाई अनिल कांबळे यांना सोबत घेत लाईफ जॅकेट, दोर, रिंग असे साहित्य घेऊन दोडामार्ग – कोल्हापूर मार्गावरील साटेली भेडशी येथील जुन्या पुलावर पोचले.या ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेली होती. त्या कार मध्ये दोन युवक अडकून पडले होते. पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्याने साटेली भेडशी वरच्या पुलावरील रस्त्यावर सर्वजण गेले त्यानंतर . हवालदार विठोबा सावंत रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर सदर बुडणाऱ्या त्या दोघांकडे फेकला त्यांनी तो दोर कारला बांधला, हवालदार सुतार यांनी पुराच्या पाण्यात उतरून सावंत यांना मदत केली.त्यानंतर विठोबा सावंत,पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी,पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत, हवालदार माळगावकर, अनिल कांबळे व ग्रामस्थ उदय धर्णे,सिद्धेश कासार, बाबा बेळेकर यांनी दोर कारला बांधून त्या दोराच्या साह्याने बुडत असणाऱ्या त्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढले. मशनु गंगाराम कांबळे , (वय – ३० ) व ज्ञानेश्वर नागोजी हळवनकर, (वय २५ वर्षे, दोघेही राहणार -रवळनाथ मंदिर जवळ, आसगाव, नांदोडे, तालुका- चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या जीपमधून जात असताना समोरची कार चालकाने पुराच्या पाण्यात घातली मात्र पाणी अधिक असल्याने गाडीसह ते पुराच्या पाण्यात अडकले व बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून या दोघांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली व कारमधील चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने दोघेजण पुराच्या पाण्यात अडकले. पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यांनी वाचवलेल्या कार चालकाचे नाव मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी , (रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश ) असे आहे.
प्रतिनिधी l दोडामार्ग