धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

फिर्यादीच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे ऍड. प्राजक्ता गावकर यांचा युक्तिवाद

हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री महेश देवकाते यांनी विजय सुहास निकम रा. नांदोस, ता. मालवण याना एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा सुनावली. या प्रकरणी फिर्यादी तर्फे अँड. राजेंद्र रावराणे यांनी काम पाहिले.
या बाबत हकीकत अशी की, फिर्यादी संतोष यशवंत पाटील, रा. पोईप, ता मालवण यांच्या कडून विजय सुहास निकम रा. नांदोस यांनी कौटुंबिक आर्थिक अडचणीपोटी 1,25,000/- रुपये रक्कम हात उसंवार होती. आरोपीशी असलेले कौटुंबिक संबंध पाहून फिर्यादी याने सदर क्कम आरोपी यास उसंवार दिली होती. त्यानंतर आरोपी याने एक महिन्यात रक्कम परत करणे आवश्यक असताना त्याने ते परत केले नाहीत. फिर्यादी यांनी जास्तच तगादा लावल्यावर आरोपीने फिर्यादी यास रु. 1,25,000/- रकमेचा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कट्टाचा धनादेश दिला. सदरचा धनादेश फिर्यादी यांनी आपल्या बँकेत भरला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नाही. त्यांनतर फिर्यादीने आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवली. नोटीसीचा कालावधी संपल्यानंतरही आरोपीने पैसे परत न केल्याने फिर्यादीने आरोपीवर निगोशीएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 नुसार फिर्याद दाखल केला होती.
या प्रकरणी मालवण न्यायालयात केस चालली. फिर्यादीचे वकील ऍड. राजेंद्र रावराणे यांनी दिलेले पुरावे व केलेला युक्तीवाद विचारात घेऊन आरोपी विजय सुहास निकम यास दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीस 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोटावली तसेच धनादेशातील रक्कम रू.1,25,000/ 30 दिवसांच्या आत फिर्यादिस देण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीच्या वतीने अँड. राजेंद्र रावराणे व अँड. प्राजक्ता गावकर यांनी काम पाहिले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!