ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष असलेल्या राणेसमर्थक ठेकेदाराने केलेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून
राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री कोणती कारवाई करणार?
शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा सवाल; आंदोलनाचा इशारा
तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्यासाठीचे शासनाचे २ कोटी रु. गेले वाया
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्याचे काम २०१९ साली मंजूर झाले होते. ७ मार्च २०१९ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता आणि ३१ जुलै २०२३ रोजी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. या रस्त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला आहे. ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे समर्थक असलेले प्रभू इंजिनियर्स या ठेकेदाराने हे काम केले आहे. राणे समर्थक ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निधी लुबाडत आहेत हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे याप्रकरणी राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री काय कारवाई करणार? कि त्या ठेकेदाराला पाठीशी घालणार? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केला आहे. जर ठेकेदारावर आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली जाणार असल्याचे बबन बोभाटे यांनी सांगितले.
कुडाळ, प्रतिनिधी