अखेर गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांना मिळाली हक्काची वेतनश्रेणी

शिक्षक समितीचे आंदोलन यशस्वी;प्रभाकर सावंत,काका कुडाळकर यांची यशस्वी शिष्टाई

संतोष हिवाळेकर पोईप

गणित विज्ञान पदवीधर शिक्षकांना एस-१४ ही वेतनश्रेणी मिळावी म्हणून मागच्या बुधवारपासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने छेडलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला यश आले असून सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकरंद देशमुख यांनी या शिक्षकांना ही वेतनश्रेणी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत या प्रश्नी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकर यांनी विशेष सहकार्य केले होते. गेली दोन वर्ष ही मागणी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली होती परंतु प्रशासनाकडून याबाबत ठोस निर्णय घेण्यात येत नव्हता. म्हणून बुधवार दि १० जुलै पासून शिक्षक समितीने बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती .शनिवारी प्रभाकर सावंत व काका कुडाळकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.देशमुख यांची भेट घेत सविस्तर चर्चा घडवून आणली होती. त्या चर्चेत प्रशासनाने तांत्रिक बाबीसाठी दोन दिवसाचा वेळ मागितल्याने शनिवारी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले होते.तथापि सोमवारी आदेश न मिळाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही शिक्षक समितीने दिला होता.अखेर आज सायंकाळी उशिरा ८० शिक्षकांना आदेश मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे संबंधित शिक्षक व शिक्षक समिती पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला.
आदेश प्राप्त होताच शिक्षक समितीने काका कुडाळकर,प्रभाकर सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अनंतराज पाटकर यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,सरचिटणीस तुषार आरोसकर,पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक,शिक्षक नेते भाई चव्हाण,भाऊ आजगावकर,नामदेव जांभवडेकर,चंद्रसेन पाताडे, सचिन मदने,रुपेश गरुड,संदीप मिराशी,राजेंद्रप्रसाद गाड,जयेंद्र चव्हाण,प्रसाद जाधव,ईश्वरलाल कदम,आप्पा सावंत,गणेश आजबे,सचिन ठाकरे,रवी चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!