विधानसभेच्या उमेदवारीसाठी सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस

ऑनलाइन सर्वेक्षण दरम्यानच्या नोंदीत आताची माहिती समोर

संदेश पारकर व अतुल रावराणे देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक

सर्वेक्षणाची उत्सुकता, उमेदवार कोण असणार?

विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार हे आमदार नितेश राणे असणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र महाविकास आघाडी कडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधातील ठाकरे शिवसेनेचा उमेदवार कोण? असा प्रश्न सध्या कणकवली मतदारसंघातील जनतेला पडलेला आहे. व हा प्रश्न जनतेच्या मनात घर करून असतानाच एका सर्वेक्षणाची लिंक सध्या कणकवली मतदारसंघातील जनतेच्या व्हाट्सअप वर गेले काही दिवस फिरत आहे. कणकवली विधानसभेसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे? असा प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व यापूर्वी विधानसभा निवडणुकीत लढवलेले सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व या पैकी कोणीही नाही असे एकूण पाच पर्याय देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात या सर्वेक्षणा दरम्यान सुशांत नाईक यांचे नाव आघाडीवर आले होते. परंतु त्यानंतर गेल्या दोन दिवसात नाईक यांना मागे टाकत सतीश सावंत यांचे नाव या सर्वे मध्ये आघाडीवर आले आहे. आज सोमवार रात्री पर्यत सतीश सावंत यांना ऑनलाइन व्होट दिलेल्यानी 40.71 टक्के पसंती दिली आहे. तर दुसऱ्या स्थानी सुशांत नाईक असून, त्यांना 26.65 टक्के पसंती मिळाली आहे. तर संदेश पारकर हे त्या पाठोपाठ असून त्यांना 25.84 टक्के पसंती देण्यात आली आहे. तर यापैकी कोणीही नाही या पसंती क्रमाला 4.21 टक्के पसंती असून, अतुल रावराणे यांना 2.59 टक्के पसंती क्रम मिळाला आहे. एकूणच हा सर्वे म्हणजे उमेदवारी अंतिम नाही. तरी देखील ज्याने कुणी या सर्व्हे चे पिल्लू सोडले ते मात्र तूर्तास महाविकास आघाडी मधील ठाकरे गटामध्ये या चार जणांमध्ये स्पर्धा निर्माण करणारे ठरले आहे. सतीश सावंत हे जरी पसंतीत पहिल्या स्थानी असले तरी उर्वरित तीन पैकी कुणाचाही नंबर ठाकरे गटाकडूनउमेदवारी साठी लागू शकतो. परंतु अजून काही महिने बाकी असताना पर्याय चाचपणी करत इच्छुकांमधून कोणीतरी मात्र एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणामध्ये सतीश सावंत व सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस दिसत आहे. त्यात करून सुशांत नाईक यांना या सर्वे मध्ये टक्कर देण्याकरिता संदेश पारकर हे देखील पाठोपाठ अवघ्या काही पसंती क्रमाने मागे आहेत. परंतु हा पसंती क्रम केव्हाही बदलू शकतो. या सर्वेक्षणाच्या पलीकडे जातही ठाकरे शिवसेनेकडून धक्का तंत्र वापरत अन्य नाव देखील पुढे येऊ शकते. सतीश सावंत व सुशांत नाईक यांच्यामधील ही ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये झालेली चुरस प्रत्यक्षात येते का? की अन्य कुठले नाव पुढे येते? ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण कणकवली मतदार संघाच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असतानाच ठाकरे विरुद्ध राणे अशी ही लढत भविष्यात दिसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा असणारा उमेदवार हा राज्यात लक्षवेधी राहणार आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!