आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धरले धारेवर
कुडाळ तालुक्यात लोक पुरात अडकून देखील मदत कार्यासाठी प्रशासन सुशेगात
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जनते समोरच विचारला जाब
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस आणि कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे.नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय व नुकसान झाले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालय काही अंतरावर असताना देखील जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी तातडीची उपाययोजना केली नाही. तात्काळ मदतकार्य करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धारेवर धरले. घरात पाणी शिरलेल्या कुटूंबियांना तात्काळ मदत पुरविण्याच्या सक्त सूचना आ. वैभव नाईक यांनी त्यांना दिल्या. आमदार नाईक यांनी आक्रमक भूमिका घेताच उशिरा दाखल झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. जिल्हाधिकारी फिरतात, 1 किलोमीटर ऑफिस असून तुम्ही 7 वाजता येताय लोकांनी आपली व्यवस्था आपण केली, कुठेय तुम्हचे आपत्ती व्यवस्थापन, काय फालतुपणा चालवलाय? तुमची बोगस यंत्रणा आहे असे सांगत आमदार नाईक यांनी रवी पाटील यांना धारेवर धरले.
दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग