खारेपाटण मध्ये पुर परिस्थिती…
सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने शुक नदीला पूर आल्याने खारेपाटण शहरात पाणी घुसून पुरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विजयदुर्ग खाडीला पुर आल्यामुळे खारेपाटण शहरात पुराचे पाणी घुसले असून खारेपाटण शहर व एस टी बस स्थानकाकडे येणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे.तर शहरात येणारी वजनाची वाहतूक व रहदारी पूर्णतः हा बंद झाली आहे. वाढत्या पुराच्या पाण्याची पातळी लक्षात घेता खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान खारेपाटण मध्ये सद्या पूरजन्य परस्थिती निर्माण झाली असून खारेपाटण बंदरवाडी कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.याबरोबरच खारेपाटण बाजारपेठ मधून मासळी मार्केट कडून कालभैरव मंदिर व जैन बस्ती कडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. तर खारेपाटण हून चिंचवली गाव व हासोळटेंब कोंडवाडी जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला असून सर्व वाहतूक व रहदारी ठप्प झाली आहे.
खारेपाटण मासळी मार्केट इमारती मध्ये पुराचे पाणी गेले असून येथील व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे.तर खारेपाटण मधील काही घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे. खारेपाटण येथील काही वाड्यांच्या भात शेतीत पुराचे पाणी गेले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
खब्रदरीचा उपाय म्हणून खारेपाटण मधील व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची उचला उचल केली असून सामान सुरक्षित स्थळी हलवित आहेत. खारेपाटण मध्ये पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पुराची पातळी वाढून बाजारपेठेसह संपूर्ण खारेपाटण शहरात आणखी जोरदार पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण