नैसर्गिक पाण्याचे स्रोत भागवतायेत कुडोपी गावची तहान
गरज स्त्रोत बळकटी करणाचे
आचरा-अर्जुन बापर्डेकर एकीकडे शासनाकडून घराघरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन सारखी योजना राबविली जात आहे.मात्र जिल्ह्यातील या योजनेच्या कामाचा आढावा घेतल्यास या योजनेच्या परीपुर्ततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.मात्र निसर्गाच्या संपन्नतेने नटलेल्या कुडोपी गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेली क्रित्येक वर्षे डोंगर माथ्यावरून झुळूझुळू वाहणाऱ्या झ-याच्या पाण्यावर केली जात असून कोणत्याही यांत्रिकीकरणाशिवाय येथील ग्रामस्थांना उपलब्ध होणारया या झ-यांचे बळकटीकरण केल्यास या भागातील ग्रामस्थांना त्याचा लाभ होउ शकतो.यासाठी शासनाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सुमारे तीनशे साडेतीनशे वस्तीचे मालवण तालुक्यातील कुडोपी गाव येथे सापडलेल्या कातळशिल्पांमुळे पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर झळकले आहे.निसर्गाने भरभरून दिलेल्या या गावची आणखीन एक खासियत म्हणजे गावात एकही विहिर बोअरवेल नसलेले गाव म्हणूनही या गावाला ओळखले जात होते.हल्ली जलजीवन मिशनसाठी खोदण्यात आलेल्या विहिरीचा अपवाद वगळता यापूर्वी या गावात एकही विहिर बोअरवेल नव्हती.सुपीकजमिन बारमाही शेती करणारा हा भाग.उन्हाळी पिकविण्यात येणारी भुईमूग, कुळीथ, मिरची यासह इतर भाजीपाला शेती सर्व काही या झ-याच्या पाण्यावरच केले जात आहे.गावच्या माथ्यावर
ब्राह्मणतळी येथे उगम पावलेला हा झरा वेशीवाडी,देवूळवाडी,मधलीवाडी, पाटणकर वाडी,खालचीवाडी टेंबवाडी या पाचभागात छोट्या पाटातून सतत वाहत खाली येत असतो.ग्रामस्थांनी आपल्या सोईसाठी या पाटाला पाईप टाकून कळशीमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे.
.ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यातही या झ-याची संततधारा सुरुच असते.यामुळे कोणत्याही खोदाईशिवाय,पंपाशिवाय निसर्गाच्या वरदस्तामुळे या गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध झालेले झ-याचे पाणी या गावासाठी वरदान ठरत आहे.पण सध्या या गावाच्या माथ्यावरील झ-याच्या उगमस्थानालगतचा भाग विकसित करण्याच्या दृष्टीने वापरला जात आहे . यामुळे या झ-याला धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.याबाबत माहिती देताना कुडोपी ग्रामस्थ आनंद पडवळ,बंडू पडवळ सांगतात. या गावांसाठी गावच्या माथ्यावर उगम पावलेला झरा वरदान ठरला.आहे.पण सध्या माथ्यावरील भागात विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांमुळ याझ-याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसे झाल्यास गेली क्रित्येक वर्षे आमच्या गावाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणारा झरा लुप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.
यासाठी शासनाने झरा बळकटी करणासाठी योग्य ती उपाययोजना केल्यास यांत्रिकीकरणाशिवाय उपलब्ध असलेला झरा कायमस्वरूपी या गावासाठी वरदान ठरू शकेल