हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता

हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान

कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक घरांचे नुकसान झाले आहे. शेखवाडीमध्ये उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम तलाठी अर्जुन घुनावन यांच्या कडून सुरू होते. गावठाणवाडी व अन्य वाड्यांमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
हरकुळ बुद्रूक बरोबरच हळवल मध्ये २०, कळसुली गावात १२ आणि साकेडी गावात ७ घरांचे नुकसान झाले आहे. प्रत्‍येक घराचे सरासरी दीड ते चार लाखापर्यंत नुकसान झाले असून सुमारे एक कोटी पेक्षा अधिक नुकसानी झाली आहे. वादळाच्या तडाख्यात अनेक घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. तसेच घरावर झाडे कोसळूनही घरांची नुकसानी झाली आहे.
दुपारी अडीच नंतर जोरदार वारे वाहू लागले. यात वादळाचा सर्वाधिक फटका हरकुळ गावातील शेखवाडी आणि गावठाणवाड्यांना बसला. येथे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्‍यामुळे अनेक घरांच पत्रे उडून दूर गेले. तर लगतच्या घरांचे पत्रे दुसऱ्या घरांवर पडूनही मोठे नुकसान झाले. तर काही घरांवर झाडे आणि फांद्या कोसळून नुकसान झाले आहे.
शेखवाडी येथे अचानक आलेले वादळ आणि घरांचे छप्पर उडून जात असल्‍याने येथील नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती. काही नागरिकांनी तर लगतच्या स्लॅबच्या घरांमध्ये जाऊन आश्रय घेतला. वादळानंतर मुसळधार सरीही कोसळल्‍या. त्‍यामुळे शेखवाडी येथील अनेक घरांमध्ये अर्धा फुटापर्यंत पाणी साचले होते. त्‍यामुळे घरातील कपडे, धान्य तसेच इतर चीज वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.
या वादळात शबीराबी शेख (वय ७०) यांच्या घरावर झाड कोसळले. यात कौलाचा एक तुकडा यांच्या खांद्यावर कोसळून त्‍यांना दुखापत झाली. दरम्‍यान जोरदार वारे, घरावर कोसळणारी झाडे तसेच अंगण व परिसरात वीज ताराही कोसळल्‍या असल्‍याने येथील नागरिकांची कुठे पळावे याबाबत मोठी त्रेधातिरिपीट उडाली होती. काही नागरिकांना घराबाहेर पडणे शक्‍य नसल्‍याने घरातच राहून देवाचा धावा करावा लागला होता. सुमारे पंधरा मिनिटानंतर वादळ थांबले आणि त्‍यानंतर पाऊस सुरू झाला. त्‍यामुळे घरातील चीज वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र शेखवाडी भागात नागरिकांने सुमारे ७० लाखापर्यंत नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे.
शेखवाडी येथील मदरसा तसेच सुलतान पटेल, अब्‍दूल हमीद सुलेमान शेख, हाफिजा आलीशा पटेल, नासीर इस्माईल पटेल, शबिराबी शेख, नूरमहंमद रहमान शेख, अब्‍दूल करीम रेहमान शेख यांच्यासह अन्य पंधरा जणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेखवाडी भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. तसेच दहा हून अधिक वीज खांब आणि तारा तुटल्‍या आहेत. त्‍यामुळे वीज दुरूस्तीची कामे होईपर्यंत एक दोन दिवस शेखवाडीवासीयांना काळोखातच काढावे लागणार आहेत. तर अनेक घरांमध्ये मोडके छप्पर आणि घरात अजनूही पाणी असल्‍याने इथल्‍या नागरिकांनी नातेवाईकांकडे आधार घेतला आहे.
महसूल विभागाकडे जसजशी नुकसानीची नोंद होत आहे. तसतसे पंचनामे केले जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तालुक्‍यात एकूण १५० घरांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे. तसेच महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीचा आकडा उद्या पंचनामे पूर्ण झाल्‍यानंतर समजेल अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील अनेक भागांमधून विद्युत पुरवठा देखील वीज पोल व तारा तुटल्याने खंडित झाला होता. मात्र हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण ला उद्याचा दिवस कमी पडण्याची शक्यता आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!